
मुंबई : ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांत मोठा बदल केला आहे. तुम्ही ५५ वर्षांचे होण्याआधीच नोकरी सोडली किंवा निवृत्ती घेतली, तर तुम्हाला पीएफची संपूर्ण रक्कम लगेच काढता येणार नाही. यासाठी आता १२ महिने वाट पाहावी लागेल. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निर्णयानंतर ईपीएफओने हे परिपत्रक काढले आहे. पण दिलासा देणारी बाब म्हणजे, नोकरी सोडल्यानंतर १२ महिन्यांच्या आत तुम्ही एकूण रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंतचे पैसे काढू शकता.
दुसरीकडे, जे कर्मचारी ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतात किंवा नोकरी सोडतात, त्यांना सर्व्हिसमधून बाहेर पडताच पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील. जर तुमची पीएफची रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती ७ ते १० दिवसांत बँक खात्यात जमा होईल. आणि जर रक्कम ५ लाखांपेक्षा कमी असेल, तर अवघ्या ३ दिवसांत पैसे मिळतील. पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईटवर 'Retirement' आणि 'Retirement after 55 years' असे दोन पर्याय दिले आहेत. ५५ वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्यांनी योग्य पर्याय निवडण्याची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांनाही पैसे मिळण्यासाठी १२ महिने वाट पाहावी लागू शकते, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.
हा नवा नियम का आणला? नोकरी बदलताना अनेक जण पीएफचे पूर्ण पैसे एकाच वेळी काढून घेतात. यामुळे खऱ्या निवृत्तीच्या वेळी त्यांच्याकडे खूपच कमी रक्कम शिल्लक राहते. हीच सवय मोडण्यासाठी आणि रिटायरमेंट फंड सुरक्षित ठेवण्यासाठी ईपीएफओने ही १२ महिन्यांची अट घातली आहे. नोकरी जाणे, ५५ वर्षांनंतरची निवृत्ती, परदेशात स्थायिक होणे, कंपनी बंद पडणे किंवा कायमचे अपंगत्व येणे अशा कारणांसाठी कर्मचारी पूर्ण पैसे काढून खाते सेटल करू शकतात. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या वर्षात ५२.९५ लाखांहून अधिक सदस्यांनी त्यांचे पीएफ खाते सेटल केले. विशेष म्हणजे, यातील ७५ टक्क्यांहून अधिक लोकांनी ५०,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम काढली आहे.