
क्रेडिट कार्ड वापरणारे अनेक जण दर महिन्याला फक्त 'मिनिमम ड्यु' (Minimum Amount Due) भरण्याची चूक करतात. यामुळे लेट फी वाचते, पण कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडणं कठीण होतं.
तुम्ही भरलेल्या पैशांमधला मोठा हिस्सा व्याज आणि जीएसटीसाठी कापला जातो. मूळ रक्कम खूपच कमी प्रमाणात वजा होते. यामुळे तुमचं कर्ज वर्षानुवर्षे तसंच राहतं. १ लाखाचं क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला या कर्जाच्या चक्रव्यूहात कसं अडकवतं?
क्रेडिट कार्डच्या बिलामध्ये 'टोटल अमाऊंट ड्यु' आणि 'मिनिमम अमाऊंट ड्यु' असे दोन पर्याय असतात.
तुम्ही वेळेवर फक्त मिनिमम ड्यु भरलात, तर लेट फी आणि पेनल्टी टळते. पण उरलेल्या रकमेवर बँक सतत व्याज लावत राहते.
क्रेडिट कार्ड कंपन्यांचे फायनान्स चार्जेस खूप जास्त असतात. त्यात व्याजावर जीएसटी लागतो. त्यामुळे तुम्ही भरलेले पैसे मूळ कर्जातून वजा न होता व्याजातच खर्च होतात.
BillCut चे सह-संस्थापक, सीईओ आणि सीटीओ तनिश शर्मा (Tanish Sharrma) सांगतात की, मिनिमम ड्यु भरल्याने फक्त त्या महिन्यापुरता दिलासा मिळतो, पण तुम्ही कर्जातून पूर्णपणे मुक्त होत नाही.
आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ. समजा तुमच्या क्रेडिट कार्डवर १ लाखाचं बिल थकीत आहे आणि त्यावर दरमहा ३.७५ टक्के फायनान्स चार्ज लागतोय.
अशा वेळी तुम्ही दर महिन्याला फक्त मिनिमम ड्यु भरत राहिलात, तर वर्षभरात तुमच्या खिशातून तब्बल ६९,१६० रुपये जातील.
पण एवढे पैसे भरूनही तुमचं मूळ कर्ज फारसं कमी होणार नाही. वर्षभरानंतरही तुमच्यावर सुमारे ७८,४७० रुपयांचं कर्ज शिल्लक राहील.
टीप: हे आकडे उदाहरणासाठी दिले आहेत. तुमची मूळ रक्कम, व्याजदर आणि मिनिमम ड्युच्या हिशोबानुसार यात बदल होऊ शकतो.
या हिशोबातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, तुम्ही वर्षभरात भरलेल्या ६९,१६० रुपयांपैकी सुमारे ४७,६३० रुपये फक्त व्याज आणि जीएसटीमध्ये जातात.
म्हणजेच, तुम्ही भरलेल्या पैशांमधून फक्त २१,५३० रुपये मूळ कर्जातून वजा होतात.
यामुळेच दर महिन्याला पैसे भरूनही कर्ज कमी होत नसल्यासारखं वाटतं. तुम्ही सतत फक्त मिनिमम ड्यु भरत राहिलात, तर हे कर्ज फेडायला अनेक वर्षे लागू शकतात.
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना मिळणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'इंटरेस्ट-फ्री ग्रेस पिरियड' (बिनव्याजी मुदत).
पण तुम्ही जुनं बिल पूर्ण न भरता काही रक्कम पुढच्या महिन्यासाठी ढकलली, तर तुम्हाला ही बिनव्याजी सवलत मिळत नाही.
याचा परिणाम असा होतो की, जुन्या थकीत रकमेवर तर व्याज लागतंच, पण तुम्ही केलेल्या नवीन खरेदीवरही लगेच व्याज लागायला सुरुवात होते. जुनं कर्ज आणि नवीन खर्च यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो.
क्रेडिट कार्डचं कर्ज हाताबाहेर जाण्याआधी काही धोक्याचे इशारे मिळतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते याकडे दुर्लक्ष करू नका.
• दर महिन्याला पैसे भरूनही एकूण बिल फारसं कमी न होणं.
• पगार संपल्यामुळे किराणा मालासारख्या रोजच्या गरजांसाठीही क्रेडिट कार्ड वापरण्याची वेळ येणं.
• एका क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड वापरणं.
• जुनं कर्ज फेडण्यासाठी पर्सनल लोन किंवा इतर ठिकाणाहून कर्ज घेणं.
यापैकी एकही गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या वापराचा गांभीर्याने विचार करायला हवा.
क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी 'पर्सनल लोन' (Personal Loan) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
समजा तुमच्या क्रेडिट कार्डवर १ लाखाचं बिल थकीत आहे. तुम्ही हे बिल १६ टक्के व्याजदराने २ वर्षांसाठी पर्सनल लोनमध्ये कन्व्हर्ट केलं, तर तुम्हाला दरमहा सुमारे ४,८९६ रुपये ईएमआय भरावा लागेल.
या हिशोबानुसार, दोन वर्षांत तुम्हाला एकूण व्याज म्हणून फक्त १७,५०० रुपये द्यावे लागतील.
क्रेडिट कार्डच्या भरमसाठ व्याजाशी तुलना केली, तर पर्सनल लोनमुळे तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.
पण पर्सनल लोन घेण्यापूर्वी काही गोष्टी नक्की तपासा.
• कर्जाचा व्याजदर किती आहे?
• प्रोसेसिंग फी (Processing Fee) किती लागणार आहे?
• तुम्हाला कर्ज मिळण्याची पात्रता आहे का?
• तुम्ही दर महिन्याला ईएमआय न चुकता भरू शकता का?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्रेडिट कार्डचं बिल पर्सनल लोनने भरल्यानंतर पुन्हा त्याच कार्डवर वारेमाप खर्च करू नका. नाहीतर तुमच्यावर दुहेरी कर्जाचा बोजा पडेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे.
क्रेडिट कार्डचा मिनिमम ड्यु भरणं हा फक्त तात्पुरता दिलासा आहे. तो कर्ज पूर्णपणे फेडण्याचा मार्ग अजिबात नाही.
त्यामुळे शक्य होईल तितकं दर महिन्याला पूर्ण बिल भरण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर आधीच कर्जाचा बोजा असेल, तर नवीन खर्च थांबवा आणि जास्त व्याज असलेलं कर्ज आधी फेडण्याचं नियोजन करा.
यापुढे जेव्हा क्रेडिट कार्डचं बिल येईल, तेव्हा 'या महिन्यात मिनिमम ड्यु भरता येईल का?' असा विचार करू नका. 'मी भरत असलेल्या पैशांमुळे माझं कर्ज खरंच कमी होतंय का आणि मी यातून पूर्णपणे कधी बाहेर पडेन?' याचा नक्की विचार करा!