
चाटचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. आलू टिक्की, पाणीपुरी, भजी किंवा कापलेली फळं—चाट मसाल्याशिवाय यांची चव अपूर्णच वाटते. हा मसाला साध्या पदार्थांनाही एकदम चटपटीत आणि भारी चव देतो. म्हणूनच बहुतेकांच्या स्वयंपाकघरात चाट मसाला असतोच. पण बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांमध्ये रसायने असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला घरच्या घरी ताजा आणि चविष्ट चाट मसाला बनवायचा असेल, तर ते अजिबात कठीण काम नाही. घरात उपलब्ध असलेल्या साध्या मसाल्यांचा वापर करून तुम्ही फक्त ५ मिनिटांत मस्त चाट मसाला बनवू शकता. चला तर मग, ही सोपी पद्धत जाणून घेऊया.
चाट मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
भाजलेल्या जिऱ्याची पावडर – २ मोठे चमचे
आमचूर पावडर – २ मोठे चमचे
काळं मीठ – १ मोठा चमचा
साधं मीठ – १ छोटा चमचा
काळीमिरी पावडर – अर्धा छोटा चमचा
लाल तिखट – अर्धा छोटा चमचा
धणे पावडर – अर्धा छोटा चमचा
सुंठ पावडर – अर्धा छोटा चमचा
हिंग – एक चिमूटभर
मसाला बनवण्याची कृती
सर्वात आधी एक स्वच्छ आणि कोरडे भांडे घ्या. त्यात भाजलेली जिरे पावडर आणि आमचूर पावडर टाका. या दोन गोष्टींमुळे चाट मसाल्याला छान सुगंध आणि आंबट चव येते.
आता यामध्ये काळं मीठ, साधं मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. रस्त्यावर मिळणाऱ्या चाटची जी खास चव असते, ती या काळ्या मिठामुळेच येते.
यानंतर यात लाल तिखट, धणे पावडर आणि सुंठ पावडर मिसळा. शेवटी एक चिमूटभर हिंग टाकून सगळे मसाले एकत्र करून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या.
झालं, तुमचा स्वादिष्ट आणि सुगंधित चाट मसाला तयार आहे. आता हा मसाला एका स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून ठेवा. या मसाल्याला ओलावा लागणार नाही आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या.