
हिरवे वाटाणे (Green Peas) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्हाला माहितीये का, १०० ग्रॅम हिरव्या वाटाण्यांमध्ये फक्त ७८ कॅलरीज असतात. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्व 'क' (Vitamin C), प्रथिने (Protein) आणि थोड्या प्रमाणात फॅट्स असतात. याशिवाय यात जीवनसत्त्व 'अ' आणि मॅग्नेशियमसुद्धा आढळतं. हिरव्या वाटाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे शरीरात साखर शोषण्याची प्रक्रिया संथ होते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
वाटाण्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होत नाही. हे फायबर आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देण्याचं काम करतं. प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत असल्यामुळे वाटाणे पचनसंस्था निरोगी ठेवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व 'क' सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवतात आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. प्रथिने आणि फायबरच्या एकत्रित परिणामामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे सारखी भूक लागत नाही आणि कमी कॅलरीज खाऊनही तुमचं वजन आटोक्यात राहतं.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हिरवे वाटाणे उत्तम आहेत. यात ल्युटीन आणि झियाक्झेंथिन नावाचे कॅरोटीनोइड्स असतात. हे घटक डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवतात. तसेच, यात जीवनसत्त्व 'अ', 'क' आणि 'के' मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जखमा लवकर भरून येतात आणि हाडं मजबूत होतात.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्त्व 'क' खूप गरजेचं असतं आणि हिरव्या वाटाण्यांमध्ये ते भरपूर प्रमाणात मिळतं. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटाणे जास्त प्रमाणात खाल्ले तर अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच खा.