Canva Layoffs : कॅनव्हामध्ये मोठी कपात, 1271 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Published : Nov 04, 2026, 12:34 PM IST
Canva Layoffs : कॅनव्हामध्ये मोठी कपात, 1271 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

सार

कॅनव्हाच्या सीईओ मेलानी पर्किन्स यांच्या मते, नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांची काम करण्याची पद्धत आणि उत्पादनांकडून असलेल्या अपेक्षा पूर्णपणे बदलत आहेत. त्यामुळे कंपनीत मोठे बदल केले जात आहेत.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन डिझाईन टेक्नॉलॉजी कंपनी कॅनव्हा इंक (Canva Inc) आता मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. कंपनीच्या वाढीचा वेग मंदावल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. या पुनर्रचनेचा फटका १२७१ कर्मचाऱ्यांना म्हणजेच कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २२ टक्के लोकांना बसणार आहे.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मेलानी पर्किन्स यांनी वेबसाईटवर कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहून या बदलांची माहिती दिली. या नव्या बदलांमध्ये नोकरकपात, कामाच्या स्वरूपातील बदल आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. पण नक्की किती लोकांच्या नोकऱ्या जाणार, याचा आकडा पर्किन्स यांनी स्पष्ट केलेला नाही.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सिडनीमध्ये मुख्यालय असलेली ही ऑनलाईन डिझाईन आणि पब्लिशिंग कंपनी गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच मंदीचा सामना करत आहे. त्यामुळेच कंपनीने स्वतःमध्ये मोठे बदल करायला सुरुवात केलीय.

सध्या जागतिक सॉफ्टवेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) मोठी उलथापालथ सुरू आहे. एआय टूल्समुळे पूर्वी ज्या कामांसाठी खास सॉफ्टवेअर लागायचे, ती कामे आता चुटकीसरशी होत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्त काम करून घेण्यासाठी एआयचा वापर वाढवत आहेत. कॅनव्हाचा हा निर्णयही याच बदलांचा एक भाग आहे.

क्लिफ ओब्रेक्ट आणि कॅमेरॉन ॲडम्स यांच्यासोबत कॅनव्हाची स्थापना करणाऱ्या पर्किन्स यांना वाटतं की, कंपनीची रचना आता अधिक सुटसुटीत असायला हवी. मोठ्या टीम्सऐवजी छोट्या आणि अधिक सक्षम टीम्सवर त्यांचा भर असणार आहे. या पुनर्रचनेत कंपनीतील अनेक विशेष पदांची संख्याही कमी केली जाणार आहे.

"नवीन तंत्रज्ञानामुळे लोक काय आणि कसं बनवू शकतात, हे पूर्णपणे बदलत आहे. ग्राहकांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत," असं पर्किन्स यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. "फक्त छोटे बदल करून चालणार नाही, या कठीण निष्कर्षावर मी पोहोचले आहे." या बदलांना त्यांनी कंपनीच्या १३ वर्षांच्या इतिहासातील 'सर्वात कठीण प्रसंग' म्हटलं आहे.

या नव्या रचनेनुसार, कॅनव्हाच्या प्रॉडक्ट टीम्सचं मुख्य केंद्र आता सिडनी असणार आहे. कर्मचाऱ्यांनी समोरासमोर येऊन काम करावं, यावर कंपनीचा भर आहे. जानेवारीपासून हायब्रिड मॉडेलवर काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस ऑफिसमध्ये येणं बंधनकारक असेल, असंही पर्किन्स यांनी स्पष्ट केलं.

सॉफ्टवेअर आणि डिझाईन क्षेत्रात एआयचा वाढता प्रभाव आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांशी जुळवून घेण्यासाठी कॅनव्हाने आपल्या कामाच्या पद्धतीत हा मोठा बदल केला आहे. layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत ३४१ कंपन्यांनी तब्बल १,३८,३१४ आयटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Family Bikes : होंडा युनिकॉर्न ते बुलेट... आरामदायी सीट आणि सस्पेन्शन असलेल्या टॉप 5 बाईक्स
Amazon Diwali Sale : आयफोन आणि सॅमसंगवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स