
BSNL Spark Plan: (दिल्ली) विविध मोबाईल कंपन्यांकडून सध्या विविध डेटा पॅकच्या ऑफर्स दिल्या जात आहेत ज्यात दैनिक, मासिक आणि दीर्घकालीन प्लॅन्स, अनलिमिटेड डेटा, OTT सबस्क्रिप्शन, नाईट डेटा किंवा अनलिमिटेड 5G डेटा यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. हे डेटा पॅक 100 रू. ते 3599 रू.पर्यंतच्या विविध किमतींमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहक गरजेनुसार डेटा आणि वैधतेनुसार त्याला हवा असणारा पॅक निवडू शकतो. यात आता BSNL चा समावेश झाला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने (भारत संचार निगम लिमिटेड) फायबर ब्रॉडबँड इंटरनेट ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला आहे. 50 Mbps वेगाच्या मासिक BSNL स्पार्क प्लॅनवर आकर्षक फायदे दिले जात आहेत. यामध्ये 3300 GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि सुरक्षित ब्राउझिंगचा समावेश आहे. या प्लॅनसाठी BSNL दरमहा 399 रुपये आकारते.
स्पार्क प्लॅनमध्ये BSNL आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना दरमहा 3300 GB डेटा देत आहे. हा प्लॅन वापरणाऱ्यांना 50 Mbps चा वेग मिळेल. ही सुरुवातीची ऑफर 12 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर, याच प्लॅनसाठी दरमहा 449 रुपये मोजावे लागतील. BSNL स्पार्क प्लॅन 13 जानेवारी 2026 पासून उपलब्ध झाला आहे. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये, BSNL ग्राहक दरमहा 3300 GB हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि सुरक्षित ब्राउझिंगचा आनंद घेऊ शकतात. BSNL स्पार्क प्लॅन मिळवण्यासाठी, वापरकर्त्यांनी 1800 4444 या व्हॉट्सॲप नंबरवर 'HI' असे टाइप करून मेसेज पाठवावा. यानंतर BSNL स्पार्क प्लॅन सक्रिय होईल.
या फायबर ब्रॉडबँड प्लॅन व्यतिरिक्त, BSNL आता मोबाईल रिचार्ज प्लॅनवर अतिरिक्त डेटा देखील देत आहे. ख्रिसमसच्या काळात BSNL ने सुरू केलेली ही ऑफर कंपनीने 31 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली होती. यानुसार, BSNL वापरकर्त्यांना 0.5 GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी BSNL मोबाईल ग्राहकांना कोणतीही विशेष रक्कम देण्याची गरज नाही. BSNL 225 रुपये, 347 रुपये, 485 रुपये आणि 2399 रुपयांच्या प्लॅनवर 0.5 GB अतिरिक्त डेटा देत आहे. यामुळे, 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा आणि 347, 485, 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रत्येकी 2.5 GB डेटा मिळेल.