
मुंबई : बँका, ब्रोकरेज फर्म्स आणि फिनटेक कंपन्या मिळून केवळ भारताची आर्थिक व्यवस्थाच नाही, तर नवीन अब्जाधीशही घडवत आहेत. ब्लूमबर्गने नुकत्याच जाहीर केलेल्या 'इंडिया फायनान्स रिच लिस्ट'मधून हेच स्पष्ट झालं आहे. या यादीत अशा १५ व्यक्ती आणि कुटुंबांचा समावेश आहे, ज्यांनी आर्थिक सेवा क्षेत्रातून आपली संपत्ती प्रचंड वाढवली आहे. या सर्वांची एकूण संपत्ती ६५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (म्हणजे जवळपास ५.४ लाख कोटी रुपये) आहे. या यादीत पारंपरिक बँकिंग आणि कर्ज क्षेत्रातील दिग्गज तसेच रिटेल इन्व्हेस्टिंग आणि डिजिटल फायनान्ससारख्या नवीन क्षेत्रांतून पुढे आलेले लोकही आहेत. ॉब्लूमबर्ग इंडिया फायनान्स रिच लिस्टमधील टॉप १० श्रीमंत कोण आहेत?
उदय कोटक
यादीत पहिलं नाव आहे उदय कोटक यांचं. १९८५ मध्ये त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून ८०,००० डॉलर्स उधार घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे २००३ मध्ये आरबीआयचं लायसन्स मिळाल्यावर ती 'कोटक महिंद्रा बँक' बनली. आज कॅपिटल मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये हा ग्रुप एक मोठं नाव आहे. त्यांची संपत्ती 16.4 अब्ज डॉलर आहे, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास १.५६ लाख कोटी रुपये.
जॉर्ज अलेक्झांडर मुथूट आणि कुटुंब
१८८७ मध्ये केरळमध्ये एका किराणा दुकानाच्या रुपात सुरू झालेला हा व्यवसाय म्हणजे मुथूट ग्रुप. १९३९ मध्ये त्यांनी गोल्ड लोन क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज 'मुथूट फायनान्स' ही भारतातील सर्वात मोठी गोल्ड लोन कंपनी आहे. आता तर ते रिअल इस्टेट, हेल्थकेअर, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. त्यांची अंदाजित संपत्ती 9.9 अब्ज डॉलर आहे.
नितीन कामत - निखिल कामत
भारतातील रिटेल ब्रोकिंग क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या 'झिरोधा'चे (Zerodha) हे दोघे भाऊ सूत्रधार आहेत. २०१० मध्ये कमी ब्रोकरेज दरात टेक्नॉलॉजीवर आधारित हे प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केलं. आज त्यांचे १.७५ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. त्यांची अंदाजित संपत्ती 9.9 अब्ज डॉलर आहे.
अजय पिरामल
टेक्स्टाईल व्यवसायातून सुरुवात करून फार्मास्युटिकल्स आणि ग्लास निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या पिरामल ग्रुपने २०१० मध्ये आपला फार्मा विभाग विकला आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसवर लक्ष केंद्रित केलं. 'दिवान हाउसिंग फायनान्स' (DHFL) विकत घेतल्यामुळे पिरामल फायनान्स कर्ज बाजारात एक मोठा प्लेयर बनला. त्यांची अंदाजित संपत्ती 4.4 अब्ज डॉलर आहे.
मोतीलाल ओसवाल, रामदेव अग्रवाल
मुंबईत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आलेले हे दोघे तरुण पुढे ब्रोकरेज क्षेत्रात खूप यशस्वी झाले. तीन दशकांत शेअर बाजाराच्या वाढीसोबत 'मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस'ही मोठी झाली. आज ही कंपनी ॲसेट मॅनेजमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. त्यांची अंदाजित संपत्ती 3.9 अब्ज डॉलर आहे.
संजय डांगी, अल्पाना डांगी
डांगी कुटुंबाची वाढ कॅपिटल मार्केट आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीतून झाली. २०१९ मध्ये लिस्टेड एनबीएफसी कंपनी 'ऑथम इन्व्हेस्टमेंट' (Authum Investment) आणि अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपमधील काही कर्ज कंपन्या विकत घेतल्यामुळे त्यांची संपत्ती वाढली. त्यांची अंदाजित संपत्ती 3.9 अब्ज डॉलर आहे.
सचिन बन्सल
फ्लिपकार्टचे (Flipkart) सह-संस्थापक असलेल्या सचिन बन्सल यांनी कंपनी वॉलमार्टला विकल्यानंतर आपलं लक्ष आर्थिक क्षेत्राकडे वळवलं. त्यांनी 'नवी' (Navi) नावाची कंपनी सुरू केली. डिजिटल कर्ज, म्युच्युअल फंड आणि विमा क्षेत्रात 'नवी'ने मोठी वाढ केली आहे. त्यांची अंदाजित संपत्ती 3 अब्ज डॉलर आहे.
संजय अग्रवाल
राजस्थानच्या ग्रामीण भागात छोटी कर्जं देण्यापासून सुरुवात करून नंतर वाहन कर्ज क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संजय अग्रवाल यांच्या संस्थेला २०१५ मध्ये आरबीआयचं लायसन्स मिळालं आणि ती स्मॉल फायनान्स बँक बनली. आज 'एयू स्मॉल फायनान्स बँक' (AU Small Finance Bank) ही भारतातील सर्वात मोठी एसएफबी आहे. त्यांची अंदाजित संपत्ती 1.9 अब्ज डॉलर आहे.
राजेश शर्मा
डेट इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या राजेश शर्मा यांनी नंतर 'कॅप्री ग्लोबल कॅपिटल' (Capri Global Capital) ही कंपनी स्थापन केली. रिटेल कर्ज आणि गोल्ड लोनवर लक्ष केंद्रित करून त्यांनी एक मोठं आर्थिक जाळं उभं केलं. राजेश शर्मा यांची अंदाजित संपत्ती 1.8 अब्ज डॉलर आहे.
आनंद राठी आणि कुटुंब
१९९४ मध्ये प्रदीप गुप्ता यांच्यासोबत मिळून आनंद राठी यांनी 'आनंद राठी ग्रुप' सुरू केला. आज ही भारतातील आघाडीच्या वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगपासून सुरुवात करून आज वेल्थ आणि ॲसेट मॅनेजमेंटमध्ये त्यांचे हजारो ग्राहक आहेत. त्यांची अंदाजित संपत्ती 1.7 अब्ज डॉलर आहे.
भारतातील लोकांमध्ये कर्जाचा वापर, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि डिजिटल फायनान्सचा वाढता वापर यामुळेच या लोकांच्या संपत्तीत एवढी मोठी वाढ झाली आहे. तरीही, सामान्य रिटेल गुंतवणूकदारांना होणारे नुकसान आणि वाढती वैयक्तिक कर्जबाजारी, ही या आर्थिक वाढीची दुसरी बाजू असल्याचंही हा रिपोर्ट दाखवून देतो.