
लखनौ: तब्बल १९ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हे लैंगिक शोषण मानले जाऊ शकत नाही, परंतु त्याच वेळी हे शिक्षकाकडून अपेक्षित नसलेले वर्तन आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
19 वर्षांपूर्वी प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNNIT) मधील एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीसोबत सहमतीने संबंध ठेवल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. ही बडतर्फीची कारवाई रद्द करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. बडतर्फीची कारवाई धक्कादायक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एका शिक्षकाकडून अपेक्षित असलेले उच्च नैतिक मापदंड याचिकाकर्त्याने पाळले नसतील, परंतु 2006 मध्ये त्यांना दिलेली बडतर्फीची कठोर शिक्षा अवास्तव होती, असे न्यायमूर्ती शमशेरी यांनी नमूद केले. 1997 ते 2000 दरम्यान पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या एका माजी विद्यार्थिनीने 2003 मध्ये दिलेल्या तक्रारीनंतर MNNIT ने शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. शिक्षण घेत असताना शिक्षकाने भावनिक आणि शारीरिक छळ केला आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप विद्यार्थिनीने तक्रारीत केला होता. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर तीन वर्षांनी आणि शिक्षकाचा दुसऱ्या महिलेशी साखरपुडा झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. बलात्काराच्या आरोपांवर MNNIT ने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीने आणि तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबावर शंका व्यक्त केली होती.
त्यानंतर, एका निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्यात आला. तक्रारदार विद्यार्थिनीसोबत संबंध असल्याचे शिक्षकाने कबूल केले, परंतु ते परस्पर संमतीने होते आणि संस्थेतून बाहेर पडल्यानंतरही संबंध सुरू होते, असा युक्तिवाद केला. चौकशी अहवालाच्या आधारे, अनैतिक वर्तन आणि भविष्यात गैरवर्तनाची शक्यता लक्षात घेऊन संस्थेने 28 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांना बडतर्फ केले. यानंतर शिक्षकाने न्यायालयात धाव घेतली.
शिक्षकाचे पद हे विश्वास आणि अधिकाराचे आहे. विद्यार्थिनीसोबतची अशी जवळीक आणि संबंध हे शिक्षण संस्थेची नैतिक चौकट मोडणारे गंभीर गैरवर्तन आहे, असा युक्तिवाद MNNIT च्या अधिकाऱ्यांनी याचिकेला विरोध करताना केला. तथापि, वेगवेगळे धर्म आणि पालकांचा विरोध यामुळे दोन्ही पक्षांमधील साखरपुडा मोडल्याने ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणले. लग्नाच्या खोट्या आश्वासनातून निर्माण झालेल्या वादाच्या कक्षेत हे आरोप येऊ शकतात, असे न्यायालयाने नमूद केले. मात्र, जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप विश्वासार्ह नाही.
भविष्यात होणाऱ्या गैरवर्तनाच्या शक्यतेच्या आधारावर बडतर्फीची शिक्षा प्रामुख्याने ठोठावण्यात आली आहे, वारंवार किंवा सततच्या उल्लंघनासाठी नाही, असे न्यायालयाने म्हटले. याचिकाकर्त्याचे वर्तन शिक्षकाच्या नैतिक अपेक्षांनुसार नसले तरी, हे प्रकरण बडतर्फीसाठी पुरेसे कारण नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.