
एअरटेल अनलिमिटेड 5G प्लॅन: भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी, एअरटेलने आपल्या युझरला मोठा धक्का दिला. एअरटेल आता मोबाईल हॉटस्पॉटद्वारे अनलिमिटेड 5G डेटा शेअर करण्याची सुविधा बंद करत आहे. या बदलामुळे युजर नाराज झाले आहेत.
अनेक युजरने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेक युजरचे म्हणणे आहे की ते त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी हॉटस्पॉट वापरतात आणि जर अनलिमिटेड 5G साठी ही सुविधा बंद केली गेली, तर त्यांना त्यांच्या कामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. इतकेच नाही, तर अनेक वापरकर्त्यांना असे वाटते की असे झाल्यास ते इतर दूरसंचार कंपन्यांकडे जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलच्या अटी आणि शर्तींचा (Terms and Conditions) एक स्क्रीनशॉट अलीकडेच X वर व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, अनलिमिटेड 5G डेटा मोबाईल हॉटस्पॉटद्वारे शेअर करता येणार नाही. जर ही अट लागू होत असेल, तर डेटा वापर वापरकर्त्याच्या दैनंदिन 4G डेटा कोट्यामधून केली जाऊ शकते, अनलिमिटेड 5G मधून नाही. तथापि, एअरटेलने अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
डेटा थेट फोनवर वापरला जात आहे की हॉटस्पॉटद्वारे दुसऱ्या डिव्हाइसवर, हे टेलिकॉम कंपनीला कसे कळते, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. तज्ञांच्या मते, टेलिकॉम कंपन्या नेटवर्क स्तरावर डेटा ट्रॅफिकची तपासणी करू शकतात. यासाठी TTL (टाइम टू लिव्ह), TCP/IP फिंगरप्रिंटिंग, HTTP यूजर-एजंट आणि डीप पॅकेट इन्स्पेक्शन (DPI) यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या डिव्हाइसेसच्या नेटवर्कचे स्वरूप ओळखू शकते.