
Cooking Tips: एअर फ्रायर आता जवळपास प्रत्येक मॉडर्न किचनमध्ये दिसतो. कमी तेलात कुरकुरीत फ्रेंच फ्राईज, चिकन फ्राय - ऐकायला हेल्दी वाटत असलं तरी, चुकीच्या वापरामुळे तो आरोग्याचा शत्रू बनत आहे.
१. ॲक्रिलामाइड (Acrylamide) - सायलेंट किलर: बटाटे, ब्रेड किंवा स्टार्चयुक्त पदार्थ १२० अंशांपेक्षा जास्त तापमानावर एअर फ्रायरमध्ये जास्त वेळ शिजवल्यास त्यात ॲक्रिलामाइड तयार होतं. WHO च्या मते, यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बटाटे जास्त लालसर किंवा करपवल्यास याचं प्रमाण सर्वाधिक असतं.
२. नॉन-स्टिक कोटिंग खराब होणं: एअर फ्रायरच्या आतील नॉन-स्टिक कोटिंगमध्ये PTFE असतं. धारदार चमचा, स्टीलच्या घासणीने घासून साफ केल्यास किंवा २०० अंशांपेक्षा जास्त तापमानावर रिकामं चालवल्यास हे कोटिंग निघून अन्नात मिसळतं. हे लिव्हर आणि थायरॉईडसाठी हानिकारक आहे.
३. प्लास्टिकसारखा वास? अनेक स्वस्त एअर फ्रायरमध्ये अन्न जास्त गरम झाल्यावर आतील प्लास्टिकमधून BPA सारखी रसायने बाहेर पडू शकतात.
१. तापमान १८० अंशांच्या खाली ठेवा: प्रत्येक गोष्ट २०० अंशांवर शिजवण्याची सवय सोडा. १६०-१८० अंश हे आदर्श तापमान आहे. वेळ थोडा जास्त लागला तरी अन्न करपणार नाही आणि विषारीही होणार नाही.
२. अन्न कधीही करपू देऊ नका: सोनेरी-पिवळ्या रंगापर्यंत ठीक आहे, पण काळे किंवा गडद तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळू नका. करपलेला भाग फेकून द्या.
३. थोडं तेल वापरा, पण योग्य तेल: अजिबात तेल न वापरता स्वयंपाक केल्यास अन्न कोरडं होऊन करपतं. ऑलिव्ह ऑईल स्प्रे किंवा मोहरीचं तेल हलकं ब्रश करून घ्या.
४. बास्केटमध्ये जास्त अन्न कोंबू नका: बास्केट भरून अन्न ठेवल्यास आत हवा खेळती राहू शकत नाही. त्यामुळे अन्न अर्धवट शिजतं आणि अर्धवट करपतं. थोडं थोडं करून दोन वेळा शिजवा.
५. स्वच्छतेचे नियम: स्वयंपाक झाल्यानंतर थंड झाल्यावर मऊ स्पंज आणि लिक्विड साबणाने स्वच्छ करा. कधीही स्टीलचा चमचा किंवा धारदार वस्तूने खरवडू नका. बटर पेपर किंवा सिलिकॉन लायनर वापरू शकता, पण हवा जाण्याची छिद्रे बंद करू नका.
एअर फ्रायर अधूनमधून वापरण्यासाठी चांगला आहे, रोजच्या स्वयंपाकाचा तो पर्याय नाही. उकडलेले, वाफवलेले किंवा कढईत कमी तेलात केलेले अन्नच सर्वात आरोग्यदायी असते.