AI Jobs: नोमुराचा रिपोर्ट म्हणतो - भारतात AI मुळे नोकऱ्या जातायत नाही, तर वाढतायत!

vivek panmand   | CMS
Published : Aug 08, 2026, 05:41 PM IST
AI Jobs: नोमुराचा रिपोर्ट म्हणतो - भारतात AI मुळे नोकऱ्या जातायत नाही, तर वाढतायत!

सार

नोमुराच्या एका रिपोर्टनुसार, भारतात AI मुळे नोकऱ्या कमी होण्याऐवजी उलट वाढत आहेत. AI मुळे ८३,१०० नवीन नोकऱ्या आल्या, तर ३१,९२१ जणांना नोकरी गमवावी लागली. पण यामुळे एक नवी समस्या तयार झालीये. अनुभवी लोकांना मागणी वाढलीये, पण फ्रेशर्स किंवा एन्ट्री-लेव्हलच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे नोकऱ्या जाण्यापेक्षा जास्त निर्माण होत आहेत. नोमुराच्या एका रिपोर्टनुसार, AI मुळे तब्बल ८३,१०० नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या, तर ३१,९२१ लोकांना नोकरी गमवावी लागली किंवा कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारतात AI चा रोजगारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र, दुसरीकडे एन्ट्री-लेव्हलच्या नोकऱ्यांची मागणी कमी झाली आहे.

नोकरी निर्मिती आणि कपात, दोन्हीत भारत पुढे

नोमुराने आशियातील अर्थव्यवस्थांवर केलेल्या अभ्यासात असं म्हटलंय की, AI मुळे होणाऱ्या नोकरी कपात आणि नवीन नोकरी निर्मिती या दोन्ही बाबतीत भारतावर सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. भारताची मोठी लोकसंख्या आणि 'ग्लोबल बॅक-ऑफिस हब' म्हणून असलेली ओळख, यामुळे AI चा रोजगारावर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ बनला आहे.

नोमुराच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, "आम्हाला असं आढळलं की, नोकरी कपात आणि AI मुळे होणारी भरती या दोन्हीमध्ये भारतावर सर्वाधिक परिणाम होत आहे. पण आतापर्यंत तरी, याचा निव्वळ परिणाम भारतासाठी सकारात्मक आहे."

नोमुराच्या डेटानुसार, आशियाई देशांमध्ये AI मुळे तयार झालेल्या सुमारे १.३१ लाख नोकऱ्यांपैकी ८३,१०० नोकऱ्या एकट्या भारतात निर्माण झाल्या. याउलट, भारतात AI मुळे ३१,९२१ नोकऱ्या गेल्या, जो सर्वे केलेल्या देशांमधला सर्वाधिक आकडा आहे.

AI मुळे तयार झाली दुहेरी बाजारपेठ

एकंदरीत नोकरभरती नोकरी कपातीपेक्षा जास्त असली तरी, याचा फायदा सर्वांना समान झालेला नाही. नोमुराच्या मते, AI मुळे लेबर मार्केटमध्ये एक प्रकारची दुहेरी व्यवस्था तयार होत आहे. कंपन्यांकडून एन्ट्री-लेव्हल कर्मचाऱ्यांची मागणी कमी झाली आहे, तर अनुभवी आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मागणी तुलनेने जास्त आहे.

यासाठी रिपोर्टमध्ये ICRIER च्या सर्वेचा हवाला दिला आहे. भारतातील ६५१ आयटी कंपन्यांच्या या सर्वेमध्ये ५५ टक्के कंपन्यांनी एन्ट्री-लेव्हल भरती कमी झाल्याचं सांगितलं. तर २५ टक्के कंपन्यांनी मिड-लेव्हल आणि १४ टक्के कंपन्यांनी सिनियर-लेव्हल भरती कमी झाल्याचं म्हटलं. कंपन्या आता ज्युनियर कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी अनेक नियमित कामं ऑटोमेट करत असल्यामुळे हा बदल दिसतोय.

या नोकऱ्यांवर टांगती तलवार आणि भरतीचा वेग मंदावला

नोमुराने बँकिंग बॅक-ऑफिस, कस्टमर सर्व्हिस आणि क्वालिटी अॅश्युरन्स टेस्टिंग व कोडिंगसारख्या ज्युनियर टेक्निकल नोकऱ्या AI मुळे धोक्यात आल्याचं म्हटलं आहे. याचा परिणाम थेट नोकरी कपातीऐवजी नवीन भरतीचा वेग मंदावण्यातूनही दिसतोय. रिपोर्टमध्ये स्टाफिंग फर्म Xpheno च्या अंदाजाचा उल्लेख आहे. त्यानुसार, भारतीय आयटी कंपन्यांमधील निव्वळ भरती आर्थिक वर्ष २०२२ (FY22) मधील ६ लाखांवरून आर्थिक वर्ष २०२६ (FY26) मध्ये १.४० लाखांपर्यंत घसरली. कारण कंपन्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांना काढण्याऐवजी कॅम्पस रिक्रूटमेंटच कमी केलं.

नवीन नोकऱ्या फक्त टेक्नोलॉजी क्षेत्रातच

त्याच वेळी, AI मुळे तयार होणाऱ्या बहुतेक नवीन नोकऱ्या टेक्नोलॉजी क्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत. नोमुराच्या मते, आशियातील सॅम्पलमध्ये ९० टक्क्यांहून अधिक AI-संबंधित नोकऱ्या टेक्नोलॉजी क्षेत्रातून आल्या आहेत. भारतात प्रामुख्याने AI डेटा अ‍ॅनोटेशन आणि भाषाशास्त्राशी संबंधित कामांसाठी भरती होत आहे.

AI मुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जातील ही भीती सुरुवातीच्या आकडेवारीनुसार तरी खरी ठरलेली नाही, असं नोमुराचं म्हणणं आहे. पण त्यांनी हा इशाराही दिला आहे की, हे तंत्रज्ञान अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याचा लेबर मार्केटवर पूर्ण परिणाम दिसायला अनेक वर्षं लागतील. रिपोर्टमध्ये म्हटलंय, "AI मुळे नोकऱ्यांवर निव्वळ सकारात्मक परिणाम झाल्याच्या निष्कर्षाने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, पण यामागे अनेक लहान-मोठे बदल घडत आहेत."

PREV
Read more Articles on

Recommended Stories

iPhone 17 Pro Max वर फ्लिपकार्टच्या Freedom Sale मध्ये भरघोस डिस्काउंट
PhonePe - Goggle Pay च्या माध्यमातून पैसे पाठवणं महागणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांबाबत मोठी बातमी