
नवीन वर्ष 2027 ला काहीच दिवस उरले आहेत. अनेकांनी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कुठे करायचं, याचे प्लॅन्सही करायला सुरुवात केली आहे. मज्जा-मस्ती करायची असेल तर लोक गोव्याला पसंती देतात, तर धार्मिक ठिकाणी जायचं असेल तर तिरुपती किंवा इतर काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकडे कल असतो. पण, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोवा आणि तिरुपतीला जाणाऱ्या काही ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
नैऋत्य रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकातून गोवा आणि तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या वेळा आणि मार्गात झालेल्या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे प्लॅन्स करण्याची विनंती केली आहे. ज्यांनी या ट्रेन्सने प्रवास करण्याचं ठरवलं होतं, त्यांनी या बदलांची नोंद घ्यावी. कॅसल रॉक आणि कुलेम मार्गावरील ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामामुळे, रेल्वे विभागाने शालिमार आणि तिरुपती ट्रेनसह गोव्याला जाणाऱ्या एकूण 8 ट्रेन्स हुबळीतच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुरुस्तीचं काम डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चालणार असल्याने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जाणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. खासकरून गोवा आणि तिरुपतीच्या प्रवाशांना याचा जास्त त्रास होईल.
नैऋत्य रेल्वेने सांगितलंय की या मार्गावरील डेमू ट्रेन सेवा पूर्णपणे रद्द केली जाईल. याशिवाय, शालिमार, तिरुपती आणि सिकंदराबादहून गोव्याच्या (वास्को द गामा) दिशेने जाणाऱ्या 8 प्रमुख ट्रेनची सेवा अंशतः रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती नैऋत्य रेल्वेने दिली आहे. वास्को द गामा आणि कुलेम दरम्यानची डेमू ट्रेन सेवा (56964/56963) 1 डिसेंबर 2026 ते 20 जानेवारी 2027 पर्यंत पूर्णपणे रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 19322: ही ट्रेन 30 नोव्हेंबर 2026 ते 18 जानेवारी 2027 पर्यंत फक्त हुबळीपर्यंतच धावेल. परतीची ट्रेन (17321) वास्कोऐवजी हुबळीहूनच प्रवास सुरू करेल.
ट्रेन क्रमांक 18047: ही ट्रेन 28 नोव्हेंबर 2026 ते 18 जानेवारी 2027 पर्यंत वास्कोऐवजी हुबळीतच तिचा प्रवास संपवेल.
ट्रेन क्रमांक 18048 (परतीचा प्रवास): ही ट्रेन वास्कोऐवजी हुबळी स्टेशनवरूनच निर्धारित वेळेत सुटेल. हुबळी-वास्को द गामा दरम्यानची सेवा 1 डिसेंबर 2026 ते 21 जानेवारी 2027 पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 17039: ही ट्रेन 2 डिसेंबर 2026 ते 15 जानेवारी 2027 पर्यंत फक्त हुबळीपर्यंतच धावेल. हुबळी-वास्को दरम्यानची सेवा रद्द राहील आणि परतीची ट्रेन (17040) हुबळीहूनच सुरू होईल.
तिरुपती-वास्को द गामा एक्सप्रेस (17419/17021 आणि 17420/17022)
3 डिसेंबर 2026 ते 14 जानेवारी 2027 पर्यंत ही ट्रेन वास्कोऐवजी हुबळीतच संपेल. हुबळी आणि वास्को दरम्यानची सेवा रद्द केली गेली आहे आणि परतीची ट्रेन (17420/17022) हुबळीहूनच प्रवास सुरू करेल.