
भारतीय बाजारात तुफान लोकप्रिय असलेल्या टाटा नेक्सॉनचं नवं म्हणजे सेकंड जनरेशन मॉडेल २०२७ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या 'प्रोजेक्ट गरुड' या सांकेतिक नावाने या नव्या नेक्सॉनवर काम सुरू असून, वेगवेगळ्या टप्प्यांवर तिची टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगदरम्यानचे अनेक फोटोही समोर आले आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये नेक्सॉन पहिल्यांदा बाजारात आली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच यात संपूर्ण पिढीचा (जनरेशन) बदल पाहायला मिळेल. मारुती सुझुकी ब्रेझा, स्कोडा कायलाक, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३ एक्सओ (Mahindra XUV 3XO) यांसारख्या तगड्या गाड्यांशी नव्या नेक्सॉनची थेट टक्कर असेल.
सध्याच्या नेक्सॉनपेक्षा नव्या मॉडेलची डिझाईन एकदम वेगळी असू शकते. आताच्या कूप स्टाईलच्या उतरत्या छताऐवजी (sloping roof) आणि गोलसर मागच्या बाजूऐवजी, नव्या नेक्सॉनला अधिक उंच आणि रांगडा पारंपारिक एसयूव्ही लूक दिला जाण्याची शक्यता आहे.
मोठी फ्रंट ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प्स, ड्युअल-फंक्शन एलईडी डे-टाईम रनिंग लाईट्स (DRL) आणि फॉक्स स्किड प्लेट हे मोठे बदल यात पाहायला मिळू शकतात. सोबतच, नवे अलॉय व्हील्स, सुधारित फ्रंट आणि रिअर बंपर, नवी एलईडी लाईटिंग डिझाईन आणि टेलगेटमध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे.
नव्या नेक्सॉनसाठी सध्याच्या X1 आर्किटेक्चरचं अद्ययावत व्हर्जन वापरलं जाण्याची शक्यता आहे. पण काही रिपोर्ट्सनुसार, ही गाडी टाटाच्या नव्या ॲटलस (Atlas) प्लॅटफॉर्मवरही बनवली जाऊ शकते. गाडीची लांबी, रुंदी आणि उंचीमध्ये मात्र फारसा फरक नसण्याची शक्यता आहे. लांबी ३,९९५ मिमी, रुंदी १,८०४ मिमी आणि उंची १,६२० मिमी असू शकते. व्हीलबेस २,४९८ मिमी आणि ग्राऊंड क्लिअरन्स २०८ मिमी इतकाच राहील, असा अंदाज आहे.
नव्या नेक्सॉनच्या केबिनमध्ये म्हणजे इंटेरिअरमध्येही मोठे बदल दिसतील. टाटाच्या नव्या गाड्यांमधून प्रेरणा घेत, डॅशबोर्ड आणि इंटेरिअर लेआऊट डिझाईन केला जाईल. सध्याच्या १०.२५ इंचांच्या टचस्क्रीनऐवजी यात आणखी मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे.
डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेमध्ये उत्तम ग्राफिक्स, नवी नॅव्हिगेशन सिस्टीम आणि गाडीची अधिक माहिती पाहायला मिळेल. सॉफ्ट-टच मटेरिअल, प्रीमियम डॅशबोर्ड फिनिशिंग, नवी सीट अपहोल्स्ट्री आणि सुधारित डोअर पॅड्स हे या गाडीचं वैशिष्ट्य असू शकतं. इल्युमिनेटेड टाटा लोगो (प्रकाशणारा लोगो) असलेलं नवं स्टीअरिंग व्हील आणि उत्तम कुशनिंग असलेल्या सीट्सही यात मिळण्याची शक्यता आहे.
वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ३६० डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि JBL ची ऑडिओ सिस्टीम हे फीचर्स नव्या मॉडेलमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे.
इंजिनच्या बाबतीत, सध्याचे पेट्रोल आणि सीएनजी पर्यायच पुढे सुरू ठेवण्याची शक्यता आहे. पण डिझेल व्हर्जनच्या भविष्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. सध्याचं १.२ लिटर, तीन-सिलेंडर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन १२० PS पॉवर आणि १७० Nm टॉर्क देतं. याच इंजिनमध्ये फॅक्टरी-फिटेड सीएनजी सिस्टीमही उपलब्ध आहे. ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड एएमटी (AMT) आणि ७-स्पीड डीसीटी (DCT) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय नव्या मॉडेलमध्येही पाहायला मिळतील. २०२७ मध्ये लाँच होणाऱ्या या नव्या नेक्सॉनमुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होईल, यात शंका नाही.