
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन कार घेणं अनेकांसाठी खूप खास असतं. सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या आणि डीलर्स भन्नाट ऑफर्स देतात. यात हजारो रुपयांची सूट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट, फ्री अॅक्सेसरीज अशा अनेक फायद्यांचा समावेश असतो. पण, जाहिरातीत दिसणाऱ्या या ऑफर्ससोबत काही अटी आणि शर्ती सुद्धा असतात. त्यामुळे, दिवाळीत कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर शोरूममध्ये जाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या. नाहीतर, आकर्षक वाटणाऱ्या ऑफर्समुळे तुमचा खर्च वाढू शकतो.
सणासुदीच्या काळात जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी डीलर्स मोठी सूट देतात. गेल्या वर्षी बनवलेल्या गाड्यांवरही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. त्यामुळे गाडी बुक करण्यापूर्वी तिचे मॅन्युफॅक्चरिंग महिना आणि वर्ष नक्की तपासा. फक्त मोठी सूट मिळतेय म्हणून जुन्या स्टॉकमधली गाडी घेऊ नका. जुन्या आणि नव्या स्टॉकच्या किमती आणि ऑफर्सची तुलना करूनच निर्णय घेणं योग्य ठरेल.
काही शोरूम्स सीट कव्हर्स, फ्लोर मॅट्स, बॉडी कव्हर्स, मड फ्लॅप्स मोफत देण्याचं आश्वासन देतात. पण काही वेळा या अॅक्सेसरीजची किंमत बिलामध्ये एक्स्ट्रा चार्ज म्हणून जोडलेली असू शकते. त्यामुळे कोणत्या अॅक्सेसरीज खरंच फ्री मिळतायत ते आधीच विचारून घ्या. नको असलेल्या अॅक्सेसरीज बिलात जोडल्या असतील तर त्या काढायला सांगा.
ज्या डीलरशिपमधून कार घेताय, तिथूनच इन्शुरन्स घेणं सक्तीचं नाही. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रीमियम आणि पॉलिसी बेनिफिट्समध्ये फरक असू शकतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त कंपन्यांचे दर तपासा आणि मगच योग्य पॉलिसी निवडा. इन्शुरन्स घेताना इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV), झिरो डेप्रिसिएशन आणि इतर कव्हर्सकडे लक्ष द्या. फक्त कमी प्रीमियम पाहून पॉलिसी निवडू नका.
जुनी गाडी देताना मिळणारा एक्सचेंज बोनस सगळ्यांना सारखाच मिळेल असं नाही. गाडीचं वय, आवश्यक कागदपत्रे यानुसार अटी बदलू शकतात. फक्त एक्सचेंज बोनस मिळतोय म्हणून जुनी गाडी कमी किमतीत देऊ नका. डीलरशिपच्या व्यतिरिक्त बाहेरही गाडीची मार्केट व्हॅल्यू तपासा. यातून तुम्हाला जुन्या गाडीची योग्य किंमत मिळतेय याची खात्री होईल.
सणासुदीच्या गर्दीत गाडीची डिलीवरी लवकर घेण्याच्या नादात अनेकजण तपासणी करणं विसरतात. पण गाडी ताब्यात घेण्यापूर्वी प्री-डिलीवरी इन्स्पेक्शन (PDI) करणं खूप महत्त्वाचं आहे. गाडीची बॉडी, पेंट, टायर्स, लाइट्स, इंजिन आणि ओडोमीटर नीट तपासा. सोबतच गाडीचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर कागदपत्रांशी जुळतोय का ते पहा. काही प्रॉब्लेम वाटला तर डिलीवरी घेण्यापूर्वी डीलरला सांगा.
फक्त कमी डाऊन पेमेंट किंवा कमी EMI पाहून लोन घेण्याचा निर्णय घेऊ नका. कमी EMI देण्यासाठी लोनचा कालावधी वाढवलेला असू शकतो. यामुळे तुम्हाला एकूण जास्त व्याज भरावं लागेल.
लोन घेण्यापूर्वी व्याजदर, प्रोसेसिंग फी, लोनचा कालावधी आणि एकूण किती रक्कम भरायची आहे ते नीट समजून घ्या. तसंच बुकिंग अमाउंट भरण्यापूर्वी बुकिंग कॅन्सल केल्यास पैसे परत मिळण्याच्या अटी लेखी स्वरूपात घ्या.
सणासुदीच्या ऑफर्सचा फायदा नक्की घ्या, पण सगळ्या अटी तपासल्याशिवाय पैसे खर्च करू नका. डिस्काउंट सोबतच गाडीची मॅन्युफॅक्चरिंग डेट, इन्शुरन्स, लोनच्या अटी आणि प्री-डिलीवरी इन्स्पेक्शनला महत्त्व दिल्यास तुमचा अनावश्यक खर्च नक्की टळेल.