
भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या धड बोलूही शकत नाहीये. ५४ वर्षांचा हा माजी क्रिकेटर सध्या महाराष्ट्रातील ठाणे इथल्या एका वृद्धाश्रमात (एल्डरली केअर सेंटर) आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. आजारपणामुळे त्याला नीट बोलता येत नसलं, तरी त्याने चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहन केलंय. यासोबतच त्याने या सेंटरमधील सुविधा आणि कर्मचाऱ्यांचं खूप कौतुक केलंय. कांबळी सध्या ठाण्यातील 'निदान सेंटर फॉर एल्डरली केअर'मध्ये आहे. इथल्या उपचारांबद्दल त्याने समाधान व्यक्त केलंय. डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफचेही त्याने आभार मानलेत. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'माझ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. इथली सर्व्हिस खूप छान आहे. इथे असलो तरी घराबाहेर असल्यासारखं अजिबात वाटत नाही. इथल्या लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळतोय.'
कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करतोय. ऑगस्ट २०२४ मध्ये त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याला नीट चालताही येत नसल्याचं दिसलं. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूप काळजीत पडले होते. २०१३ मध्ये कांबळीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आर्टरी ब्लॉकेजमुळे त्याची अँजिओप्लास्टीही करावी लागली. २०२४ च्या शेवटी त्याची तब्येत आणखी बिघडली. युरिन इन्फेक्शन, स्नायूंमध्ये पेटके येणे, चक्कर आणि ताप यामुळे त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तपासणीत त्याच्या शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचं आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडल्याचं समोर आलं. यामुळेच त्याला स्नायूंचा त्रास आणि चालण्यात अडचण येत होती. त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्याचंही समोर आलं होतं. रुग्णालयात सुमारे दोन आठवडे उपचार घेतल्यानंतर १ जानेवारी २०२५ रोजी त्याला डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडताना त्याला आधाराची गरज लागली, तेव्हा त्याच्या हातात क्रिकेटची बॅट होती. त्यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते.
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
कांबळीचा बालपणीचा मित्र आणि टीम इंडियातील सहकारी सचिन तेंडुलकर त्याला खूप मदत करतोय. सचिनच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त कांबळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर गेला होता. याच मैदानावर या दोन्ही दिग्गजांनी रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले होते. सचिन आपल्या या जुन्या मित्राला सर्वतोपरी मदत करत आहे. याच मदतीमुळे कांबळीचे उपचार सुरळीत सुरू आहेत.