
ठाणे : भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांच्या प्रकृतीवरून क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील एका वृद्धाश्रमात कांबळी राहत असल्याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ ठाण्यातील 'निदान सेंटर फॉर एल्डरली केअर' मधील आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये कांबळी वृद्धाश्रमातील स्वच्छता आणि सुविधांचं कौतुक करताना दिसत आहेत. इथलं वातावरण अगदी घरच्यासारखं वाटतं, असं ते या व्हिडिओत सांगत आहेत. पण, त्यांना स्पष्टपणे बोलताना खूप त्रास होत असल्याचंही यात दिसतंय. त्यांची ही अवस्था पाहून चाहते खूप चिंतेत पडले आहेत.
५४ वर्षीय विनोद कांबळी गेल्या काही काळापासून गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करत आहेत. कांबळी यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाली असून त्यामुळे त्यांना स्मरणशक्तीचा त्रास होत आहे, असा खुलासा त्यांचे मित्र आणि माजी फर्स्ट क्लास अंपायर मार्कस कुटो यांनी केला होता. ते गोष्टी लवकर विसरतात आणि धूम्रपानामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिल्याचंही कुटो यांनी सांगितलं होतं. पण, कांबळी यांची पत्नी अँड्रिया हेविट हिने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. कांबळी यांची प्रकृती ठीक असून त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं अँड्रियाने स्पष्ट केलं होतं.
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
बॅटिंग लिजेंड सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र असलेला विनोद कांबळी हा भारतीय क्रिकेटमधील एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू मानला जायचा. पण, करिअरची शानदार सुरुवात करूनही त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. भारतासाठी १७ टेस्ट आणि १०४ वनडे सामने खेळल्यानंतर त्यांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.