
Team India T20 Captaincy: २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्स (LA 2028 Olympics) आणि T20 वर्ल्ड कपमध्ये (ICC Men's T20 World Cup 2028) टीम इंडियाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाहिलं होतं. पण आता हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही. कारण कॅप्टन म्हणून तर सोडाच, पण एक साधा खेळाडू म्हणूनही तो आता भारतीय संघात नाही. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबत बोलताना, संघातून वगळल्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला, 'टीममध्ये माझं नाव नाही हे पाहून मला हसू आलं. कारण गेल्या एक-दोन वर्षांत जेव्हा-जेव्हा मी अशा परिस्थितीत सापडलो, दबाव होता किंवा गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नव्हत्या, तेव्हा मी हसलोच आहे. मी स्वतःला शांत ठेवलं. याआधीही मला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी आभारी आहे.'
सूर्यकुमारने सांगितलं की, T20 टीमची कॅप्टन्सी गमावल्याने त्याला आश्चर्य वाटलं होतं. त्याला वाटलं होतं की तो किमान अजून दोन वर्षं तरी टीमचं नेतृत्व करेल. पण, निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने सलग दोन वर्षं एकही द्विपक्षीय T20 मालिका गमावली नव्हती. याच काळात टीम इंडियाने २०२५ चा आशिया कप (Asia Cup 2025) आणि या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात झालेला T20 वर्ल्ड कप (ICC Men's T20 World Cup 2026) जिंकला होता. एवढं यश मिळवूनही सूर्यकुमारला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात टीम इंडिया यशस्वी ठरत असली तरी, २०२५ पासून त्याची बॅट शांत होती. त्याने २१ आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये फक्त २१८ धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी केवळ १३.६२ होती. या खराब कामगिरीनंतरच बीसीसीआयने (BCCI) नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) T20 टीमचा नवा कॅप्टन बनवण्यात आलं. इतकंच नाही, तर इंग्लंड दौऱ्यापूर्वी सूर्यकुमारला टीममधूनही वगळण्यात आलं. तेव्हापासून तो टीमच्या बाहेरच आहे.