
मुंबई : भारतीय क्रिकेटचे आयकॉन सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मोदींच्या "देशाप्रती असलेल्या अथक समर्पणाचे" कौतुक केले. हे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्याने पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
क्रिकेट दिग्गजांकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा
सचिनने एक्स (X) वर पोस्ट करत लिहिलंय, "माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देशाप्रती तुमचं अथक समर्पण आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देतं. तुम्ही भारताला नव्या उंचीवर घेऊन जात आहात, त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना."
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना ७६ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव त्यांना उत्तम आरोग्य आणि सर्व सुख देवो. ते देशासाठी एक उत्तम नेते राहिले आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना हवं तितकं यश मिळो, अशी मी आशा करतो. त्यांना वाढदिवसाच्या आणि निरोगी आयुष्याच्या खूप शुभेच्छा."
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष (BJP) देशभरात 'सेवा संकल्प अभियान' राबवत आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर असा महिनाभर चालणाऱ्या या अभियानात अनेक सेवाभावी कार्यक्रम आणि लोकांशी जोडले जाणारे उपक्रम आयोजित केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबा आणि वडिलांचे नाव दामोदरदास मोदी आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
या खास प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचाही समावेश आहे.