
आकृती अग्रवालने सोशल मीडिया क्रिएटर आणि अभिनेत्री म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबत साखरपुडा झाल्यानंतर ती जास्त चर्चेत आली होती. पण आता या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्च २०२६ मध्ये या भारतीय क्रिकेटपटूसोबत साखरपुडा केलेल्या आकृतीने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली.
मूळची लखनौची असलेली आकृती अग्रवाल एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच ती कुटुंबासोबत मुंबईत राहायला आली. तिने निर्मला मेमोरियल फाउंडेशन कॉलेजमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचं (BMS) शिक्षण पूर्ण केलं आहे.
डान्स, लिप-सिंकिंग, फॅशन आणि लाइफस्टाइलशी संबंधित शॉर्ट व्हिडिओजमधून तिला मोठी ओळख मिळाली. कोरोना काळात तिने आपले व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली होती. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर तिने आपला चाहतावर्ग वाढवला. आज इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर फोकस असला तरी, आकृतीने अभिनयातही नशीब आजमावलं आहे. ती 'त्रिमूखा' (Trimukha) या सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसली होती.
सोशल मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्यामुळे आकृती आणि पृथ्वी शॉ यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. मार्च २०२६ मध्ये त्यांनी फोटो शेअर करत अधिकृतपणे साखरपुड्याची घोषणा केली होती.
पण त्यांचा हा साखरपुडा लग्नापर्यंत पोहोचू शकला नाही. १७ सप्टेंबर २०२६ रोजी आकृतीने पृथ्वी शॉसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली. भविष्यातील ध्येय वेगवेगळी असल्याचं कारण तिने यासाठी दिलं. तसंच यावर कोणतेही तर्कवितर्क लावू नयेत, अशी विनंतीही तिने चाहत्यांना केली.
सध्या आकृतीच्या या पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, आकृती मात्र डिजिटल जगतात आणि अभिनयात आपलं करिअर पुढे नेत आहे.