
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची वनडे सीरिज २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सीरिजसाठी शुभमन गिलकडे कॅप्टनन्सी, तर केएल राहुलकडे व्हाईस-कॅप्टनन्सी देण्यात आली आहे. बऱ्याच काळानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे संघात परतले आहेत. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे. तसेच, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजनेही वनडे संघात कमबॅक केलं आहे.
वनडे संघात रोहित, कोहलीची एन्ट्री
विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलला संधी मिळाली असून, ऋषभ पंतला मात्र वनडे संघातून डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या यादीनुसार पंतच्या जागी जुरेलची निवड झाली आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळालेले नाही. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ हवा असल्याने वेस्ट इंडिज वनडे सीरिजसाठी त्याचा विचार झालेला नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून दोन युवा खेळाडू टीम इंडियात पदार्पण करणार आहेत. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू नमन धीर आणि जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी यांना सिलेक्टर्सनी संधी दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर या दोघांची १५ सदस्यीय वनडे संघात निवड झाली आहे.
वनडे संघ: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जयस्वाल आणि नमन धीर.
पाच सामन्यांची टी-२० सीरिज ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या फॉरमॅटमध्ये श्रेयस अय्यर कॅप्टन, तर तिलक वर्मा व्हाईस-कॅप्टन असणार आहे. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. नितीश कुमार रेड्डीची दोन्ही फॉरमॅटसाठी निवड झाली आहे.
टी-२० संघ: श्रेयस अय्यर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव. या सीरिजसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे सीरिज २७ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी खेळवली जाईल. तर टी-२० सीरिज ६ ऑक्टोबरपासून सुरू होऊन १७ ऑक्टोबरपर्यंत चालेल. यातील चौथा टी-२० सामना १४ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.