
IPL 2027: आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल करत आहे. कायरन पोलार्डकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिल्यानंतर, आता गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि पारस म्हांब्रे यांना कार्यमुक्त करण्यात आलंय. याशिवाय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांनाही फ्रँचायझीने निरोप दिला आहे. नुकतंच महेला जयवर्धनेच्या जागी पोलार्डला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच या तीन प्रशिक्षकांना दिलेला निरोप पाहता, संघात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. नवीन प्रशिक्षक कोण असतील, याची घोषणा मुंबई इंडियन्सने अद्याप केलेली नाही. पण लवकरच ही नावे समोर येऊ शकतात.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या यशात मलिंगाचा खूप मोठा वाटा आहे. श्रीलंकेचा हा माजी वेगवान गोलंदाज सुरुवातीला खेळाडू म्हणून संघाशी जोडला गेला होता. व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून पुन्हा मुंबईच्या ताफ्यात परतला. खेळाडू म्हणून त्याने फ्रँचायझीला चार वेळा आयपीएल आणि २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रशिक्षक म्हणून परतल्यानंतर त्याने संघाची गोलंदाजीची धुरा उत्तमरित्या सांभाळली. पण आता त्याला निरोप दिल्याने त्याचा मुंबईसोबतचा एक मोठा अध्याय संपला आहे.
पारस म्हांब्रे यांचाही मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास खूप जुना आहे. २०१० ते २०१७ या काळात ते फ्रँचायझीसोबत होते. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं. ऑक्टोबर २०२४ मध्ये ती जबाबदारी संपल्यानंतर म्हांब्रे पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतले होते. संघाची गोलंदाजी मजबूत करण्यात आणि गोलंदाजांना घडवण्यात त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा झाला. पण आयपीएल २०२७ च्या आधी नव्या कोचिंग सेटअपमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांनाही न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.