
मुंबई: आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या रणसंग्रामात आज पाऊस विलन ठरला असला, तरी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी मात्र धावांचा पाऊस पाडून मुंबई इंडियन्सची झोप उडवली आहे. पावसामुळे ११ ओव्हर्सच्या करण्यात आलेल्या या 'शॉर्ट फॉरमॅट' सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि युवा वैभव सूर्यवंशी या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.
मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण राजस्थानच्या सलामीवीरांनी हा निर्णय साफ चुकीचा ठरवला.
जयस्वालचा 'चहर'वर प्रहार: पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालने दीपक चहरला टार्गेट केलं. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल २२ धावा लुटल्या.
बुमराहला वैभवचं प्रत्युत्तर: दुसऱ्या ओव्हरमध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह समोर होता, पण १७ वर्षीय वैभव सूर्यवंशीने त्यालाही सोडलं नाही. पहिल्याच चेंडूवर गगनभेदी षटकार खेचत त्याने बुमराहच्या ओव्हरमध्ये १३ धावा वसूल केल्या.
राजस्थान रॉयल्सने ११ ओव्हर्समध्ये निर्धारित वेळेत १५० धावांचा हिमालय उभा केला आहे.
यशस्वी जयस्वाल: ७७ धावांची नाबाद वादळी खेळी.
वैभव सूर्यवंशी: अवघ्या १४ चेंडूत ३९ धावांची तडाखेबंद इनिंग.
रियान पराग: २० धावांचे योगदान.
आता मुंबई इंडियन्सला विजयासाठी ६६ चेंडूत १५१ धावांचे महाकठीण आव्हान पेलावे लागणार आहे. ११ ओव्हर्सच्या खेळात जवळपास १४ च्या सरासरीने धावा बनवणे सोपे नसले तरी, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माची फलंदाजी पाहता सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.