
T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील आपल्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी कँडीच्या पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कामगिरी केली, पण तरीही संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानचा संघ फक्त 104 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून लेग स्पिनर ॲडम झाम्पाने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. तर, ग्लेन मॅक्सवेल आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. ओमानकडून वसीम अलीने 32, जतिंदर सिंगने 17, हम्माद मिर्झाने 16 आणि करन सोनावलेने 12 धावा केल्या.
105 धावांच्या सोप्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला. कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी 93 धावांची दमदार पार्टनरशिप करून संघाला विजय मिळवून दिला. मार्शने कॅप्टनला साजेशी खेळी करत अर्धशतक ठोकलं. तर ट्रेविस हेड 32 धावा करून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने फक्त 1 विकेट गमावून केवळ 9.4 ओव्हर्समध्ये, म्हणजेच 62 चेंडू शिल्लक ठेवूनच लक्ष्य गाठलं. ओमानकडून शकील अहमदला एकमेव विकेट मिळाली. त्याने ओपनर ट्रेविस हेडला स्वतःच्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं.
या विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला. ग्रुप-बी मध्ये संघाला श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने आयर्लंड आणि ओमानविरुद्ध सामने जिंकले, पण दोन पराभवांमुळे त्यांना पुढच्या राऊंडमध्ये जाता आलं नाही.
2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. हा संघ आणि ऑस्ट्रेलियन फॅन्ससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. आता सुपर-8 मध्ये 21 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. ग्रुप-2 मधील हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.