
बंगळुरू: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सची स्पोर्ट्स सायन्स-मेडिकल टीम आणि वरिष्ठ पुरुष निवड समिती यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडल्याने हा नवा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला निवड समितीला वाटत होतं की बुमराह श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असेल, पण नंतर त्याची दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचं स्पष्ट झालं.
या संदर्भात बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यात चर्चा सुरू आहे. बंगळुरूमधील अत्याधुनिक सुविधा असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कारभारावर सध्या जोरदार टीका होत आहे. नितीन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर या सेंटरला कायमस्वरूपी प्रमुख नाही. सध्याचे हंगामी प्रमुख धनंजय कौशिक यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. खेळाडूंच्या दुखापतीतून बरे होण्याच्या वेळापत्रकाचं आणि नियमांचं नीट पालन होतंय की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
याआधी हर्षित राणाचं वजन जास्त असूनही स्पोर्ट्स सायन्स टीमने त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिलं होतं. त्यामुळे त्याच्या पायाची दुखापत पुन्हा बळावली. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या एका प्रसिद्ध दक्षिण भारतीय टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचं वजनही जास्त असल्याची माहिती समोर आली होती. पण कोलकाता किंवा बंगळुरू कॅम्पमध्ये स्पोर्ट्स सायन्स टीमला हे ओळखता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदरचा फिटनेस हा देखील चिंतेचा विषय आहे, कारण सततच्या दुखापतींमुळे त्याच्या करिअरवर परिणाम होत आहे.
याशिवाय, नितीश कुमार रेड्डीने स्वतंत्र प्रशिक्षक स्टीफन जोन्स यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी प्रशिक्षण घेतलं. त्यामुळेच त्याची दुखापत आणखी वाढली का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश जैन यांच्या कामाचा आढावा देखील बीसीसीआयच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. ते जवळपास पाच वर्षांपासून टीमसोबत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात खेळाडूंना सतत दुखापती होत असल्याचं व्यवस्थापनाच्या लक्षात आलं आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याने, आगामी आढावा बैठक ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष होईल अशी अपेक्षा आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी प्रभावी संवाद आणि खेळाडूंच्या फिटनेसचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, असं मानलं जातंय.