
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेने दिलेलं मोठं लक्ष्य गाठण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. मुल्लानपूरमध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला.
या पराभवाची मुख्य दोन कारणं दिसत आहेत. पहिलं म्हणजे, पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी आणि दुसरं म्हणजे, धावांचा पाठलाग करताना टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचं अपयश. या सामन्यात भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी पाहूया...
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 213 धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या लक्ष्यामुळे भारतावर प्रचंड दडपण आले. विशेषतः आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. डी कॉकने फक्त 46 चेंडूंत 90 धावा करून संघाला मजबूत पाया घालून दिला.
त्याला साथ देत एडेन मार्करम, डोनोवन फरेरा आणि डेव्हिड मिलर यांनी महत्त्वाच्या खेळी केल्या. या सर्वांनी आक्रमक खेळ केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा रन रेट कुठेही कमी झाला नाही. परिणामी, धावफलकावर मोठी धावसंख्या लागली. भारतीय गोलंदाजी प्रभावी ठरली नाही.
भारतीय गोलंदाज सातत्य राखण्यात अपयशी ठरले. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखण्यात ते पूर्णपणे अयशस्वी झाले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोकळेपणाने फटके मारण्याची संधी आपल्या गोलंदाजांनी दिली.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची लाइन आणि लेंथ चुकली. त्याने एकाच षटकात तब्बल सात वाइड चेंडू टाकून एक खराब विक्रम आपल्या नावावर केला. या अतिरिक्त धावांमुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या आणखी वाढली. त्याच्या त्या एका षटकाने सामन्याचे चित्रच पालटले.
जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासारखे अनुभवी गोलंदाजही धावांचा प्रवाह रोखू शकले नाहीत. वेगवान गोलंदाजीचा हल्ला अजिबात प्रभावी ठरला नाही. अक्षर पटेलने सुरुवातीला बरी गोलंदाजी केली, पण शेवटी त्यानेही धावा दिल्या. वरुण चक्रवर्तीने ठीकठाक कामगिरी केली.
214 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा डाव रुळावरून घसरण्यामागे टॉप ऑर्डरचे अपयश हेच मुख्य कारण होते. सुरुवातीलाच महत्त्वाचे विकेट गमावल्याने लक्ष्य गाठणे कठीण झाले. सलामीवीर शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. यामुळे संघाचा आत्मविश्वास खचला.
त्याचबरोबर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवही आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे जास्त वेळ टिकू शकले नाहीत. पॉवर प्ले संपण्यापूर्वीच भारताने तीन विकेट गमावले होते. त्यामुळे सामना जिंकण्याची शक्यता खूपच कमी झाली. हार्दिक पांड्यानेही 23 चेंडूंत केवळ 20 धावा केल्या आणि तो स्ट्राइक रेट वाढवण्यात अपयशी ठरला.
भारताच्या डावातील एकमेव सकारात्मक गोष्ट म्हणजे तिलक वर्माची फलंदाजी. एका बाजूने विकेट पडत असताना, तिलक वर्माने धैर्याने लढा दिला. त्याने फक्त 34 चेंडूंत 62 धावा करत एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून योग्य साथ मिळाली नाही.
इतर फलंदाजांनी क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्नही केला नाही. तिलक वर्मा वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली भागीदारी करू शकला नाही. अखेर भारताचा संघ 19.1 षटकांत 162 धावांवर सर्वबाद झाला.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलेले काही निर्णयही या सामन्यात संघासाठी प्रतिकूल ठरले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमाला फारसे महत्त्व नसते आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजांना पाठवले पाहिजे, असा गंभीरचा प्लॅन दिसला.
या सामन्यात अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे हा एक मोठा प्रयोग होता. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंवा रन रेट वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा. मात्र, हा प्रयोग पूर्णपणे फसला. अक्षर पटेलने 21 चेंडूंत केवळ 21 धावा केल्या आणि तो बाद झाला.
यामुळे डावाचा वेग तर कमी झालाच, पण नंतर येणाऱ्या फलंदाजांवरही दडपण वाढले. हा निर्णय 'बॅकफायर' झाल्याचे मत समालोचकांनीही व्यक्त केले. एकूणच, गोलंदाजांची खराब कामगिरी, टॉप ऑर्डरचे अपयश आणि रणनीतिक चुकांमुळे दुसऱ्या T20 मध्ये भारताला मोठी किंमत मोजावी लागली.