Palash Muchhal Decided to Postpone Wedding : स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे, स्मृतीच्या आधी पलाश मुच्छलनेच लग्न पुढे ढकलण्यास सांगितले होते, अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न सांगलीत होणार होते, पण ऐनवेळी ते पुढे ढकलण्यात आले. लग्नाच्या विधींआधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
24
मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
जेवण करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, श्रीनिवास यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.
वडिलांची प्रकृती बिघडल्याने स्मृती मानधनाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले.
34
पलाश मुच्छलनेच घेतला होता निर्णय
दरम्यान, स्मृती मानधनाच्या आधी पलाश मुच्छलनेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता, असे त्याची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमिता मुच्छल म्हणाल्या, ''पलाशचे मामांवर (स्मृतीचे वडील) खूप प्रेम आहे.
स्मृतीपेक्षाही ते दोघे जास्त जवळचे आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीच्या आधी पलाशनेच घेतला होता,'' असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्मृती मानधनाच्या वडिलांप्रमाणेच तिचा होणारा पती पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडली होती. व्हायरल इन्फेक्शन आणि ॲसिडिटीमुळे पलाशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता, हे विशेष.