
IND vs BAN Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १९.३ षटकांत १२७ धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देत दोन बळी घेतले. बुमराहला लयीत पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले. यामध्ये अभिनेता बॉबी देओल आणि राघव जुयाल यांचाही समावेश आहे. बॉबी देओल आणि राघव जुयाल सामना पाहण्यासाठी पोहोचले होते.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन टीव्ही होस्ट आहे. तिने दोन्ही अभिनेत्यांची मुलाखत घेतली. दोघांनीही सुपर फोर सामन्यात भारताला खेळताना पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. बॉबी देओल म्हणाला की तो लहान मुलासारखा उत्साही आहे आणि या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेत आहे. त्याने भारताच्या गोलंदाजीतील कामगिरीचे कौतुक केले आणि जसप्रीत बुमराहच्या कामगिरीला विशेष पसंती दिली. त्याच्या किफायतशीर स्पेल आणि महत्त्वाच्या विकेट्सकडे त्याने लक्ष वेधले.
राघव जुयाल म्हणाला की, तो पहिल्यांदाच क्रिकेट स्टेडियममध्ये थेट सामना पाहत आहे. जेव्हा संजनाने त्याला चाहते आणि संघासाठी एक छोटा संदेश देण्यास सांगितले, तेव्हा जुयालने मजेशीरपणे बुमराहचे कौतुक केले. तो बुमराहचा खूप मोठा चाहता असल्याचे त्याने सांगितले. जुयालने त्याच्या शोमधील एक ओळ मजेशीरपणे उद्धृत करत म्हटले, “अख्खी (सारी) दुनिया एकीकडे, माझा बुमराह एकीकडे.”
जुयालने संजनाला (जी बुमराहची पत्नी आहे) ही ओळ पुन्हा म्हणण्याची विनंती केली. यावर संजना हसून म्हणाली, "अख्खी (सारी) दुनिया एकीकडे, माझा बुमराह एकीकडे." तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.