Asia Cup 2025 : भारताच्या वादळात बांगलादेशचा धुव्वा, सूर्याची टीम फायनलमध्ये!

Published : Sep 24, 2025, 11:58 PM IST
Asia Cup 2025

सार

Asia Cup 2025 आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात बांगलादेशला 41 धावांनी पराभूत करून भारताने स्पर्धेत अपराजित राहत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांच्या एकत्रित कामगिरीमुळे टीम इंडियाचा विजय झाला.

Asia Cup 2025 : विद्यमान चॅम्पियन टीम इंडिया 2025 च्या आशिया कप स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे. सुपर-4 फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांगलादेशवर 41 धावांनी सहज विजय मिळवला. यासह, एक सामना शिल्लक असतानाच भारताने आशिया कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजी विभागाच्या एकत्रित कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेत अपराजित राहत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धक्का दिला. तन्झिद हसन तमीम एक धाव काढून शिवम दुबेकडे झेल देऊन तंबूत परतला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी सैफ हसन आणि परवेझ होसेन यांनी 44 धावांची भागीदारी केली. ही जोडी कुलदीप यादवने तोडली. परवेझने 21 धावा केल्या, तर तौहिद हृदय (7) आणि शमीम होसेन यांनी खाते न उघडताच वरुण चक्रवर्तीला विकेट दिली. एकीकडे विकेट पडत असताना दुसरीकडे सैफ हसनने एकाकी झुंज दिली. सलामीवीर म्हणून आलेल्या सैफ हसनने 51 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावा केल्या आणि नववा फलंदाज म्हणून बाद झाला. बांगलादेशसाठी सैफ हसन आणि परवेझ वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताची संघटित गोलंदाजी

भारताकडून शिस्तबद्ध गोलंदाजी करताना कुलदीप यादवने तीन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावावर केले.

तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला पुन्हा एकदा स्फोटक सुरुवात मिळाली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केवळ 6.2 षटकांत 77 धावांची भागीदारी केली. उपकर्णधार शुभमन गिलने केवळ 19 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकारासह 29 धावा करून रिशाद होसेनला आपली विकेट दिली.

अभिषेक शर्माची धडाकेबाज कामगिरी

पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात आक्रमक फलंदाजी करत आशिया कपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने आपला फॉर्म कायम ठेवला. केवळ 37 चेंडूंचा सामना करताना अभिषेक शर्माने 6 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांसह स्फोटक 75 धावा केल्या. पण अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा धावबाद झाला.

दुबे, सूर्या अपयशी

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शिवम दुबेने (2) एकेरी धावसंख्येवर बाद होऊन निराशा केली. कर्णधार सूर्यकुमार यादवची फलंदाजी केवळ 5 धावांपुरती मर्यादित राहिली. सूर्याने 5 धावा करण्यासाठी तब्बल 11 चेंडू वाया घालवले. मागील सामन्याचा हिरो ठरलेला तिलक वर्मासुद्धा केवळ 5 धावा करून तन्झिम हसन शकिबला आपली विकेट देऊन बसला.

शेवटी, हार्दिक पांड्याने सावध फलंदाजी करत 29 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकारासह 38 धावा केल्या आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईच्या पराभवानंतर रोहितचा मोठा निर्णय, मुश्ताक अली T20 क्रिकेटमध्ये परतणार!
स्मृतीच्या भावाने सत्यच सांगून टाकलं, स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तारीख ठरली?