
मुंबई: २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमधील विजयानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी आयसीसी (ICC) रँकिंगमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ताज्या क्रमवारीत भारताच्या युवा फलंदाजांनी मोठी झेप घेतली असून, विशेषतः संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या कामगिरीची जगभर चर्चा होत आहे.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा ८७५ गुणांसह जगातील नंबर १ फलंदाज म्हणून आपले स्थान टिकवून आहे. मात्र, त्याच्या खुर्चीला आता ईशान किशनने जोरदार टक्कर दिली आहे. वर्ल्ड कपमधील स्फोटक कामगिरीच्या जोरावर ईशान ८७१ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक आणि ईशानमध्ये आता केवळ ४ गुणांचा फरक उरला आहे.
या वर्ल्ड कपचा खरा हिरो ठरलेल्या संजू सॅमसनने रँकिंगमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' ठरलेला संजू थेट ६५ व्या क्रमांकावरून २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
संजूची आकडेवारी: ५ सामन्यांत ८०.२५ च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा. त्याने या स्पर्धेत तब्बल २४ षटकार आणि २७ चौकार खेचले.
फलंदाजांच्या टॉप १० यादीत भारताचे चार फलंदाज आहेत.
अभिषेक शर्मा (१ ला क्रमांक - ८७५ गुण)
ईशान किशन (२ रा क्रमांक - ८७१ गुण)
तिलक वर्मा (७ वा क्रमांक - ७२४ गुण)
सूर्यकुमार यादव (९ वा क्रमांक - ७२२ गुण)
कर्णधार सूर्याला दोन स्थानांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपले पहिले स्थान गमावले असून तो आता दुसऱ्या स्थानी (७४० गुण) घसरला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान ७५३ गुणांसह पुन्हा एकदा जगातील नंबर १ टी-२० गोलंदाज बनला आहे. तर 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह एका स्थानाने प्रगती करत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.