
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आलाय. ११ ऑक्टोबरला आपला ३३ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हार्दिकने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या व्हिडीओमध्ये बुटाच्या आकाराचा केक, काही खास शूज आणि SG ब्रँडचा लोगो दिसतोय. त्यामुळे हार्दिकच्या नव्या कोलॅबोरेशनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिक पांड्याने आपला वाढदिवस एकदम हटके स्टाईलमध्ये साजरा केला. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत माहिका शर्माही दिसतेय. दोघेही बेडरूममध्ये वेळ घालवताना दिसतात आणि त्यानंतर हार्दिक बुटाच्या आकाराच्या केकवरील ३३ नंबरच्या मेणबत्त्या विझवताना दिसतो. यानंतर काळ्या आणि चंदेरी रंगाच्या शूजची झलक आणि SG चा लोगो स्क्रीनवर झळकतो.
या दृश्यांमुळे चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या SG सोबत मिळून स्वतःचा नवा शू ब्रँड आणणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. पण, या नव्या प्रोजेक्टबद्दल हार्दिकने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
विराट कोहलीच्या पावलावर पाऊल?
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 'One8' या स्वतःच्या ब्रँडच्या माध्यमातून स्पोर्ट्सवेअर आणि लाईफस्टाईल मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हार्दिक पांड्याच्या व्हिडीओमधील हिंट्स पाहून चाहते त्याची तुलना विराटशी करत आहेत. काही जणांना वाटतंय की हार्दिक स्वतःचा शू ब्रँड सुरू करतोय, तर काहींच्या मते हे SG सोबतचं एखादं खास कोलॅबोरेशन असू शकतं. सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
पण, हार्दिक स्वतःचा शू ब्रँड सुरू करतोय याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या फक्त व्हिडीओमधील हिंट्सवरून चाहते अंदाज बांधत आहेत.
SG ब्रँड नेमकं काय आहे?
हार्दिकच्या व्हिडीओमध्ये दिसणारा SG म्हणजे सॅन्सपॅरेल्स ग्रीनलँड्स (Sanspareils Greenlands). क्रिकेटच्या साहित्यामध्ये हा एक खूप जुना आणि प्रसिद्ध ब्रँड आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये याचं मुख्य कार्यालय आहे. केदारनाथ आनंद आणि द्वारकानाथ आनंद या भावांनी १९३१ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी क्रिकेटच्या बॅट्स, बॉल आणि इतर साहित्य बनवण्याचं काम करते.
आता हार्दिक पांड्याने SG सोबतच्या या नव्या कनेक्शनमुळे सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. या प्रोजेक्टमध्ये तो गुंतवणूकदार असणार की ब्रँड ॲम्बेसेडर, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
माहिका शर्माने काय शेअर केलं?
हार्दिकच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी माहिका शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल एक मोठी पोस्ट शेअर केली होती. तिने सांगितलं की, बडोद्यामध्ये वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत हार्दिक प्रामुख्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. चांगली फलंदाजी करूनही त्याला संघात कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
माहिकाने पुढे लिहिलंय की, हार्दिकची फिटनेस आणि धावण्याची आवड त्याला क्रिकेटर म्हणून घडवण्यात खूप उपयोगी पडली. एका सीनियर कोचने चुकून त्याचं बॉलिंग टॅलेंट ओळखलं आणि तिथूनच तो अष्टपैलू खेळाडू बनला. बॅटरवरून फास्ट बॉलिंग ऑलराउंडर बनलेल्या हार्दिकला अवघ्या दोन वर्षांनंतर मुंबई इंडियन्स संघात संधी मिळाली.
या बदलामुळे त्याच्या क्रिकेट करिअरला एक नवी दिशा मिळाली, असं माहिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एकंदरीत, हार्दिक पांड्याच्या ३३ व्या वाढदिवसाच्या व्हिडीओने क्रिकेट चाहत्यांमध्ये नवी उत्सुकता निर्माण केली आहे. SG सोबतचं हे कोलॅबोरेशन नवीन शूज लाँच करण्यासाठी आहे की आणखी काही, हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.