
Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. सामन्याचा थरार किती असेल, पिच आणि हवामान सामन्याला पूरक ठरेल का? भारत-पाक सामन्यासाठी मैदान असलेल्या दुबई क्रिकेट स्टेडियमचे हवामान अंदाज आणि पिच रिपोर्टची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अॅक्वावेदरच्या अंदाजानुसार, दुबईमध्ये आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पावसाची शक्यता नाही. दिवसा ३९ अंश सेल्सिअस तापमान असेल. पाऊस पडण्याची शक्यता नसली तरी खेळाडूंना दुबईच्या प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागेल. वाऱ्याचा वेग ताशी ३३ किमी असेल असा अंदाज आहे. सामन्याच्या वेळी रात्री ३० अंश सेल्सिअस तापमान असेल असा अंदाज आहे. आकाश निरभ्र असेल, पण हवेची गुणवत्ता चांगली राहणार नाही असा अंदाज आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मध्यवर्ती पिच हायव्होल्टेज सामन्यासाठी सज्ज झाला आहे. दुबईच्या पिचवर जास्त वेग अपेक्षित नाही. येथील पिच वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना अनुकूल असेल असा अंदाज आहे. पुढील सामन्यांमध्ये पिच फिरकीला अधिक अनुकूल होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता आहे.
दुबईमध्ये आजच्या आशिया कप सामन्यात उतरताना पाकिस्तान क्रिकेट संघावर भारतीय संघाचे स्पष्ट वर्चस्व आहे. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान १९ वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने १० आणि पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. टी२० प्रकारात भारताचे स्पष्ट वर्चस्व आहे. १३ सामन्यांपैकी १० मध्ये भारत विजयी झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघ गेल्या दीड दशकात पहिल्यांदाच बहुपक्षीय स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरत आहे. सुरुवातीलाच भारताच्या दोन-तीन विकेट्स पडल्यास, संघाला सांभाळण्यासाठी विराट कोहली नाही. त्यामुळे पाकिस्तान संघ भारतावर दबाव आणू शकतो, असे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मिस्बा उल हक म्हणाले आहेत.
सामना सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने माइंड गेम सुरू केले आहे. तर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी बाहेरील गोष्टींकडे लक्ष न देता फक्त सामन्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला दिला आहे.