
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. अरुण जेटली स्टेडियमवर तो अफगाण गोलंदाजांची धुलाई करेल, असं चाहत्यांना वाटत होतं...
पण गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांनी ओपनिंग जोडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तोच डावखुरा फलंदाज ओपनिंगला येईल, यावर ते ठाम होते. पण कोण तो?
७ फेब्रुवारी २०२६. टी-२० वर्ल्ड कपमधली भारताची पहिली मॅच. सूर्यकुमार यादवच्या टीममधल्या सर्वात स्फोटक टी-२० बॅटरची बॅट त्या शनिवारी शांत झाली. तेव्हापासून ते थेट सप्टेंबरपर्यंत त्याच्या नावावर फक्त टीकाच होत होती. ऑफ-स्पिनच्या जाळ्यात तो सतत अडकत होता. त्याच्या खेळात सातत्य नव्हतं, दुहेरी आकडा गाठतानाही त्याची दमछाक होत होती. संजू सॅमसनला टीमबाहेर बसवलं जातं, मग याला तोच नियम का लागू होत नाही, असा प्रश्नही विचारला जात होता...
पण टीम मॅनेजमेंटने त्याला एकदाही वाऱ्यावर सोडलं नाही. याच्यात असं काय खास आहे, हा प्रश्न मात्र सतत विचारला जात होता...
या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्यांसाठी एक क्षण पुरेसा होता. १७ सप्टेंबर, रात्री ८ वाजून १७ मिनिटे. अरुण जेटली स्टेडियमकडे एकदा नजर टाका. खचाखच भरलेल्या स्टेडियममधला प्रत्येक चाहता त्याच्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवत होता. त्या प्रचंड जल्लोषात, एखादं वादळ शांत झाल्यावर जसं वातावरण असतं, तसा तो चालत येत होता... अभिषेक शर्मा.
३४ चेंडू, ११ षटकार, ९ चौकार. स्ट्राईक रेट ३१७. गेल्या सहा महिन्यांपासून आपल्यावर उठणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला, टीकेला आणि शंकेला बॅटने उत्तर देण्यासाठी अभिषेकने हाच दिवस निवडला.
त्याने डावाची सुरुवात डिफेन्सिव्ह शॉटने केली. त्यानंतर फझलहक फारुकीच्या हाफ व्हॉलीवर एक्स्ट्रा कव्हरवरून त्याने बाऊंड्री मारली. अजमतुल्लाह ओमरझाईचं स्वागत त्याने दोन षटकार आणि एका चौकाराने केलं. यात क्रीझच्या बाहेर येऊन स्वीपर कव्हरवरून मारलेला एक क्लासिक अभिषेक शॉटही होता.
फारुकी दुसऱ्यांदा गोलंदाजीला आला, तेव्हा पहिल्याच चेंडूवर त्याने साईट स्क्रीनच्या पलीकडे उत्तुंग षटकार ठोकला. टायमिंग आणि एक्झिक्युशनचं हे उत्तम उदाहरण असल्याचं संजय मांजरेकर यांनी कॉमेंट्री करताना सांगितलं. फारुकीच्या त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेकने तब्बल २२ धावा कुटल्या.
इब्राहिम झाद्रानने जास्त विचार न करता लगेच स्पिनर्सना गोलंदाजी दिली. आधी ऑफ-स्पिनर मुजीब उर रहमान आला, त्यानंतर मोहम्मद नबी. तिसरा गोलंदाज होता रशीद खान. पण संजू आणि अभिषेकच्या जोडीने या तीन ओव्हर्समध्ये ५५ धावा चोपल्या. पॉवरप्ले संपला तेव्हा भारताचा स्कोर १०० वर पोहोचला होता. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला. या डावखुऱ्या बॅटरने अवघ्या २२ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. याला तुम्ही 'इन्सेन हिटिंग' म्हणू शकता. बॅट स्विंग, टायमिंग - सगळंच एकदम परफेक्ट होतं.
अभिषेकच्या या खेळीला संजूच्या स्ट्राईक रोटेशनची भक्कम साथ मिळाली. फॉर्ममध्ये असलेल्या पार्टनरला कशी साथ द्यायची, याचं संजूने उत्तम उदाहरण दिलं. ज्या चेंडूंवर तो स्वतः मोठे फटके मारू शकत होता, तिथेही त्याने सिंगल काढून अभिषेकला स्ट्राईक दिली.
पॉवरप्ले संपल्यावर सर्वांना फक्त एकच उत्सुकता होती, रोहित शर्माचा तो रेकॉर्ड मोडणार का? ३५ चेंडूत ठोकलेलं ते शतक. दोन ओव्हर्सनंतर अब्दुल्ला अहमदझाईच्या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने भिरकावून देत अभिषेकने रेकॉर्ड बुकमध्ये रोहितचं नाव पुसून स्वतःचं नाव कोरलं. ३० व्या चेंडूवर त्याने शतक पूर्ण केलं. टेस्ट खेळणाऱ्या देशाच्या खेळाडूने केलेलं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. त्यानंतर हेल्मेट काढून तो खेळपट्टीवरच मेडिटेशनच्या पोझमध्ये बसला.
ऑफ-स्पिनर्स ही अभिषेकची सर्वात मोठी कमजोरी आहे, अशी टीका होत होती. पण आता ती जुनी गोष्ट झाली. मुजीबविरुद्ध त्याने ५ चेंडूत १७ धावा काढल्या. मोहम्मद नबीविरुद्ध ३ चेंडूत १६ धावा. नबीविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट ५३३ होता. दिल्लीत रशीद खानलाही त्याने सोडलं नाही. अभिषेकने ज्या गोलंदाजांचा सामना केला, त्यापैकी फक्त अहमदझाईविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट ३०० च्या खाली होता, तोही २०० होता हे विसरू नका. त्याच्या एकूण धावसंख्येपैकी ९४ टक्के धावा या फक्त बाऊंड्रीजमधून आल्या.
संजू आणि अभिषेकची जोडी अशीच पुढे खेळत राहील... वैभवला मात्र अजून थोडी वाट पाहावी लागेल...