
आपल्या जबरदस्त खेळानं जगभरात करोडो चाहते कमावलेला या पिढीतील महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो वर्ल्ड कप जिंकू न शकल्याने ढसाढसा रडला. गेल्या २३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणाऱ्या रोनाल्डोने तब्बल ६ वर्ल्ड कप खेळले, पण त्याला एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही.
'हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे,' असं रोनाल्डोने आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सोमवारी स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आपल्या लाडक्या खेळाडूला असं रडताना पाहून त्याचे चाहतेही भावुक झाले. सामन्यानंतर बोलताना रोनाल्डो म्हणाला, 'अशाप्रकारे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने खूप दुःख झालंय. मी टीमसाठी माझं सर्वस्व दिलं. पोर्तुगालसाठी मी ३ ट्रॉफी जिंकल्या आहेत. २०१६ चा युरो कप माझ्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासारखाच आहे.'
त्याने वर्ल्ड कपमध्ये एकूण २७ सामने खेळले असून ११ गोल केले आहेत. वर्ल्ड कपच्या ६ वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये गोल करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
नियती कधीकधी सर्वोत्तम खेळाडूही बदलू शकत नाहीत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोला अखेर हे कटू सत्य स्वीकारावं लागलं की वर्ल्ड कप जिंकणं त्याच्या नशिबात नव्हतं. वयाच्या ४१ व्या वर्षापर्यंत संघाचं नेतृत्व करण्यासाठी त्याने स्वतःला फिट ठेवलं... pic.twitter.com/PGhIcbxT7z— PanditFootball.com (@panditfootball) July 6, 2026
सोमवारी मध्यरात्री झालेल्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात माजी चॅम्पियन स्पेनने पोर्तुगालचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयासह स्पेनने २०१० नंतर प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम ८ च्या फेरीत स्पेनचा सामना बेल्जियमशी होईल.
सिएटल (अमेरिका): यजमान अमेरिकेचा फिफा वर्ल्ड कपमधील प्रवास प्री-क्वार्टर फायनलमध्येच संपला आहे. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात संघाला १-४ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. २५ वर्षीय चार्ल्स डे केटेलेरेने २ गोल आणि १ असिस्ट करत बेल्जियमला अंतिम ८ मध्ये पोहोचवलं, तर अमेरिकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली.
९व्या मिनिटाला केटेलेरेने गोल करून बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. ३१व्या मिनिटाला मलिक टिलमॅनने गोल करत अमेरिकेला बरोबरी साधून दिली. पण त्यानंतर अवघ्या २ मिनिटांतच केटेलेरेने आणखी एक गोल करून बेल्जियमला पुन्हा आघाडीवर नेलं.
दुसऱ्या हाफमध्ये हॅन्स वॅनाकेनने (५७वे मिनिट) गोल करून बेल्जियमची आघाडी वाढवली. तर, इंज्युरी टाइममध्ये रोमेलू लुकाकूने गोल करत विजयातील अंतर आणखी वाढवलं. यासह बेल्जियम संघ चौथ्यांदा क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला असून, आता त्यांचा सामना स्पेनशी होणार आहे.
यंदा फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करणारे तिन्ही देश प्री-क्वार्टर फायनलमध्येच पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. कॅनडाला मोरोक्कोकडून, तर मेक्सिकोला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. आता अमेरिकेचा बेल्जियमकडून पराभव झाल्याने यजमान देशांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अमेरिका संघाने खेळलेल्या शेवटच्या ४ वर्ल्ड कपमध्ये त्यांना अंतिम १६ च्या फेरीतच बाहेर पडावे लागले आहे. १९३० मध्ये तिसरे स्थान मिळवलेल्या या संघाने २००२ मध्ये क्वार्टर फायनल गाठली होती. २०१०, २०१४, २०२२ आणि आता २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये संघाचा प्रवास प्री-क्वार्टर फायनलमध्येच संपला आहे. २०१८ मध्ये हा संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला नव्हता.