Mumbai Fire : विलेपार्ल्यात इमारतीला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

Published : Aug 12, 2026, 09:09 AM IST
Mumbai Fire : विलेपार्ल्यात इमारतीला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

सार

Vile Parle Building Fire : मुंबईच्या विलेपार्ले भागातील एका उंच इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने टेरेसवरून १५ जणांची सुखरूप सुटका केली. सध्या आग नियंत्रणात आहे.

विले पार्ले, मुंबई : मुंबईतील विले पार्ले इथे मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. विलेपार्ले येथील एका १२ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

ही घटना विलेपार्ले (पश्चिम) येथील चर्च रोडवर, सेंट झेवियर्स स्कूलजवळ असलेल्या 'शांता भवन' इमारतीत रात्री साधारण १० वाजून २ मिनिटांनी घडली. ही आग जवळपास ४,००० चौरस फूट परिसरात पसरली. इमारतीमधील इलेक्ट्रिकल वायरिंग, एसी युनिट, घरातील सामान, सोफा, बेड, फॉल्स सीलिंग आणि स्वयंपाकघरातील वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

बचावकार्य आणि अधिकृत माहिती

अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला, तर दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या आग नियंत्रणात आणली असून, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचं नेमकं कारण काय, हे सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होईल, असंही भोसले यांनी ‘ANI’शी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, "आग इमारतीच्या ११ व्या मजल्यावर लागली होती. आता ती नियंत्रणात आणली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. टेरेसवर १५ जण अडकले होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेत एका महिलेचा आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. आगीचं नेमकं कारण काय, हे सविस्तर तपासानंतरच कळेल".

मृतांची आणि जखमींची ओळख पटली

BMC च्या PRO कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अबीर (वय २.५ वर्षे) आणि अंकिता (वय २३) यांचा मृत्यू झाला आहे. तर पार्थ, हिरेन, यशस्वी आणि अभिषेक अशी जखमी झालेल्या चार जणांची नावे समोर आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

भायखळ्यातही लागली होती आग

याआधी, रविवारी मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एका खोलीत लागलेली आग आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पसरली. ही लेव्हल १ ची आग होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं मालमत्तेचं नुकसान झालं नाही.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक