
Uddhav-Raj Thackeray Press Conference : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील बीएमसी निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम झाल्यानंतर वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा केली.
या युतीचे संकेत शिवसेना (UBT)चे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिले होते. अखेर दोन्ही पक्षांमधील चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर आले. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने ही युती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या घोषणेकडे लागले होते.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानावरून रवाना झाले. त्यांच्यासोबत सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे होत्या. ते आधी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ठाकरे बंधूंसह कुटुंबीयांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी आदेश बांदेकर, अनिल परब, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यानंतर सर्वजण वरळी येथे पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
मुंबईसोबतच नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मिरा-भाईंदर या महापालिकांमध्येही ठाकरे बंधू युतीतून निवडणूक लढवणार आहेत. युतीची औपचारिक घोषणा बाकी असली तरी जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या मशालीला राज ठाकरेंच्या इंजिनाची जोड मिळाल्याने ही युती किती प्रभावी ठरते, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत अधिकृत युती केली नव्हती. मनसेने कायमच बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे जवळपास दोन दशकांच्या मनसेच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच औपचारिक युती ठरली आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने या युतीला भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
युती जाहीर होण्यास विलंब होण्यामागे जागावाटपाचा मुद्दा कारणीभूत ठरला. १० ते १५ जागांबाबत मनसे समाधानी नसल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी युती जाहीर करून उर्वरित जागांवर नंतर चर्चा करू, अशी भूमिका शिवसेना (UBT)कडून होती. मात्र मनसे नेतृत्वाने सर्व जागांचे वाटप पूर्ण झाल्यानंतरच युती जाहीर करण्याचा आग्रह धरल्यामुळे घोषणेला विलंब झाला.