
मुंबई - भारतातील एका पर्यटन स्थळी आलेल्या विदेशी महिलेला सेल्फीसाठी काही पुरुषांनी त्रास देण्याची घटना मुंबईत घडली आहे. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांच्या वर्तनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ ही घटना घडली आहे.
भारतातील विविध पर्यटन स्थळांना येणाऱ्या परदेशी पर्यटकांना त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही अनेक वेळा घडले आहेत. त्याचप्रमाणे आता मुंबईत एका परदेशी महिलेला सेल्फीसाठी काही पुरुषांनी त्रास दिला आहे. परिचीत व्यक्तीने खांद्यावर हात ठेवून फोटो काढणे सामान्य आहे. पण या व्हिडिओत अपरिचित महिलेला काही तरुणांनी त्यांची प्रेयसी असल्यासारखे तिच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढले आहेत, काही पुरुषांच्या या वर्तनावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ डॉ. शीतल यादव यांनी ट्विटरवर पोस्ट केला असून, आपल्या देशातील लोकांच्या अशा वर्तनामुळे अमेरिका आपल्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, भारत भेटीच्या वेळी प्रवासी सल्ला देते. त्यात महिलांनी भारतात एकट्याने प्रवास करू नये, जर प्रवास केला तर त्यांच्यावर बलात्कार किंवा हिंसाचार होण्याची शक्यता असते असे अमेरिकेचा प्रवासी सल्लागार सूचित करतो असे शीतल यादव यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून लिहिले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी एक विदेशी महिला पर्यटक एकटी आली होती. यावेळी तिला पाहून एका व्यक्तीने तिच्याकडे सेल्फी मागितला. ती होकार देण्याआधीच त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढला. हे पाहून तिथे असलेले सर्व पुरुष तिला घेरून सेल्फीसाठी गर्दी करू लागले. जवळपास सर्वांच्या हातात फोन होता आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढण्यासाठी ते सर्वजण तिच्याभोवती गर्दी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य अनेकांना धक्कादायक वाटले.
यावेळी एवढ्या तरुणांना पाहून महिलेला अस्वस्थ वाटले. तिने एका फोटोसाठी १०० रुपये मागितले. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला असून, तिथे सेलिब्रिटीसारखे तिला घेरलेल्या तरुणांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच काहींनी हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना टॅग करून या पुरुषांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांमुळेच भारताचे परदेशात नाव खराब होते. अशा व्यक्तींना तुरुंगात पाठवावे अशी टिप्पणी केली आहे. अशा प्रकारे भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना अशा लोकांपासून वाचवा, हे लोक देशाचे नाव खराब करत आहेत असे दुसऱ्या एकाने लिहिले आहे. परदेशी महिलेसोबत हे लोक कसे वागत आहेत असे एकाने लिहिले आहे.
गेल्या वर्षी दिल्लीतील इंडिया गेटजवळ रशियन वंशाच्या एका पर्यटकाला असाच त्रास देण्यात आला होता. स्थानिक नर्तकाने महिलेला अस्वस्थ वाटेल असे वर्तन केले होते. महिला फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना, तो व्यक्ती तिच्यासोबत नाचण्यासाठी सतत आग्रह करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. तिच्या विरोधाला न जुमानता त्या व्यक्तीने व्हिडिओ काढणे सुरू ठेवले आणि माफी मागण्याऐवजी तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला.