मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार? आदित्य ठाकरेने दिलेत सुचक संकेत

Published : Jun 05, 2025, 08:47 AM ISTUpdated : Jun 05, 2025, 08:48 AM IST
Aaditya Thackeray addresses media on the all-party delegation visiting key partner countries

सार

शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपल्या शैलीत पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्यावर भाष्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनुकूल प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून दोन्ही गटांकडून एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपल्या शैलीत पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य एकजुटीच्या चर्चेला आता नव्या उंचीवर नेणारा आवाज खुद्द युवानेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. “जो कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे येईल, त्याच्यासोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत,” असे वक्तव्य करत त्यांनी एका अर्थाने उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील ‘राजकीय मैत्री’साठी दारे खुली असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आदित्य ठाकरे बुधवारी आपल्या वांद्रे मतदारसंघात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रित कामकाजाबाबत विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना त्यांनी केवळ भूतकाळाकडे न पाहता महाराष्ट्राच्या भविष्याकडे बघण्याची गरज असल्याचे सूचित केले.

संयुक्तपणे केले आंदोलन

“काल्याण-डोंबिवलीतील अपूर्ण उड्डाणपुलाविरोधात झालेल्या शिवसेना (उबाठा) आणि मनसे कार्यकर्त्यांच्या संयुक्त आंदोलनाचं उदाहरण स्पष्टपणे सांगतं की आमची दिशा आणि हेतू स्पष्ट आहेत. आम्हाला माहित आहे की जनतेला काय हवं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.

ठाकरे गटाच्या नेत्याने वक्तव्य

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आमदार सुनील प्रभूंनी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हटलं, “महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनतेची इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत आणि महाराष्ट्रासाठी काम करावं.”

शिवसेना (उबाठा) पक्षातील प्रमुख नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी देखील याआधी राज आणि उद्धव यांच्यातील एकतेचा खुलेआम पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र मनसेच्या नेत्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. पक्षप्रमुख राज ठाकरेच या संदर्भात निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंचे रहस्यमयी मौन

या सर्व घडामोडींचा उगम एप्रिल महिन्यात झाला, जेव्हा राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी झालेल्या पॉडकास्टमध्ये ‘उद्धव ठाकरे यांच्याशी भूतकाळात झालेले वाद क्षुल्लक होते,’ असं सांगत पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. “मराठी जनतेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी म्हटलं होतं. यावर तातडीनं प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे यांनी देखील “महाराष्ट्राच्या हितासाठी छोट्या वादांना बाजूला ठेवायला आम्ही तयार आहोत,” असं जाहीर केलं होतं.

त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या या विषयावर मौन बाळगले आहे. मागील महिन्यात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “योग्य वेळी मीच निर्णय घेईन, तोपर्यंत कोणीही या विषयावर वक्तव्य करू नये.”

विचारधारांमधील अंतर

राज ठाकरे यांनी २००६ मध्ये नेतृत्व आणि विचारधारांतील मतभेदामुळे शिवसेनेतून वेगळे होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना वारसदार मानण्यात आलं, यावरून राज ठाकरे नाराज होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत फूट पडली आणि एक वेगळा राजकीय प्रवास सुरू झाला.

आज जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याची शक्यता समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही चर्चा अधिक तीव्र होत आहे.

मुंबईतील समिकरणे बदलणार

या संभाव्य एकजुटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय पटावरील समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी मतदारांचा मोठा वर्ग दोन्ही नेत्यांमधील एकतेकडे आशेने पाहत आहे. मात्र यासाठी केवळ भावना नव्हे, तर ठोस निर्णय आणि परिपक्व राजकीय विचारांची गरज आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!