Rains Alert Mumbai Pune पुढील तीन दिवस पावसाचे धुमशान, घाटमाथ्याला दिलाय ''यलो अलर्ट''

Published : Jun 05, 2025, 08:28 AM ISTUpdated : Jun 05, 2025, 08:34 AM IST
mumbai

सार

आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानता बाळगण्यासही सांगितले आहे.

पुणे - मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. परंतु, त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानता बाळगण्यासही सांगितले आहे.

राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी, राज्यातील विविध जिल्ह्यांसह घाटमाथ्याच्या भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाने प्रारंभी समाधानकारक प्रगती केली होती. मात्र, नंतर पोषक हवामानाचा अभाव भासू लागल्यामुळे मान्सूनची गती मंदावली. सद्यस्थितीत मान्सून मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानी फाटा आणि पुरी या भागांमध्ये स्थिरावलेला आहे. पुढे सरकण्यास त्याला अडथळे येत आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या गुजरातच्या वायव्य भागात आणि बांगलादेशच्या उत्तर भागात हवेच्या वरच्या स्तरावर चक्रीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, या पावसाचा जोर फारसा अधिक नसेल. दिवसभरातील हवामानात सकाळच्या सत्रात ऊन पडेल, तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल, असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. वाऱ्याचा वेग सुमारे ३० ते ४० किमी प्रतितास राहील, अशी शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागांत शेतकरी वर्गाने पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मध्यम स्वरूपाचा पाऊस शेतीस अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, पुणे व पुण्याचा घाटमाथा, जळगाव, नाशिक, सातारा व घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!