मुंबईवर अदानी, शेठजींचे आक्रमण होतंय, हे रोखण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावे, खासदार संजय राऊत यांचा महत्त्वपूर्ण सल्ला

Published : Jun 05, 2025, 12:29 PM IST
Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut (File Photo/ANI)

सार

आता संजय राऊत यांनी मुंबईवर अदानी आणि शेठजींचे अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे जवळपास दिसून येत आहे.

मुंबई : दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा मुद्दा असेल तर खासदार संजय राऊत यांच्या विधानाला अत्यंत गांभीर्याने घेतले जाते. आता संजय राऊत यांनी मुंबईवर अदानी आणि शेठजींचे अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे जवळपास दिसून येत आहे.

“लग्न, साखरपुडा आणि मधुचंद्र या जुन्या संज्ञा आहेत, सध्याचा काळ हा लढ्याचा आहे,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीसंदर्भातील सूचनांवर प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी थेट अदाणी समूहाच्या नावाने हल्लाबोल करत सांगितलं की, "मुंबईवर अदाणी आणि शेठजींचं आक्रमण सुरू आहे. दिल्लीतून आणि गुजरातच्या भूमीवरून मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे."

त्यांनी अधिक स्पष्टपणे सांगितलं, "मुंबई फुकटात गौतम अदाणींच्या घशात घालण्यात येते आहे. विद्यमान सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावांनी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायला हवं. मला खात्री आहे की, ते एकत्र येतील."

राज यांनी मराठी माणसांची संघटना उभारली

संजय राऊत यांनी यावेळी मराठी नेतृत्वाने एकत्र येण्याचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला. "राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या विचारासाठी स्वतंत्र संघटना उभी केली आहे, प्रकाश आंबेडकरांनीही तसेच केलं आहे. आता या सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

आम्ही सर्व एकसुरात बोलतोय

राऊत म्हणाले, "आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण एका सुरात बोलतोय. मनसेसोबत युतीबाबत आमच्यात मतैक्य आहे. यावर कोणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत."

संभाव्य युतीच्या दिशेने ठोस पाऊल

संजय राऊत यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय भूमिका स्पष्ट करणारे नाही, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या दिशेने एक गंभीर आणि ठोस पाऊल असल्याचे संकेत देणारे ठरत आहे. अदाणी समूहासंबंधी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर एकत्र येण्याचं आवाहन, हे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!