
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुणासोबतही युती करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भावांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. दोघे एकमेकांना फोन करु शकतात, असे सुचक वक्तव्य केले आहे. यामुळे दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या ‘खिळेमुक्त वृक्ष’ अभियानामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणविषयक उपक्रमाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) यांच्यातील संभाव्य युतीबाबत स्पष्ट भाष्य करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
दोघा भावांनी बोललं पाहिजे
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांच्या पार्श्वभूमीवर विचारले गेलेले प्रश्न टाळण्याऐवजी अमित ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. त्यांनी म्हटलं, "दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते फोन करू शकतात. मीडियात बोलून किंवा वर्तमानपत्रांतून युती होत नाही."
अमित ठाकरे यांनी युतीसंदर्भातील आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना म्हटलं, "२०१४ आणि २०१७ मध्ये मी पाहिलं आहे. कोरोनाकाळात देखील राज साहेबांनी उद्धवजींना फोन करून पाठिंबा दिला होता. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. राज साहेबांनी म्हटलं होतं, हा भीषण आजार आहे. त्यामुळे कोणतंही सरकार असो, आपण एकत्र राहायला हवं."
दोन भाऊ एकत्र यावेत
अमित ठाकरे यांची भूमिका ही व्यक्तिगत नव्हती, तर एक विवेकपूर्ण राजकीय संकेत होता. त्यांनी कोणत्याही राजकीय आराखड्यांना बगल देत, स्पष्टपणे सांगितलं की, निर्णयाचा केंद्रबिंदू हे दोन नेते, राज आणि उद्धव, एकत्र हवे आहेत. "दोन भाऊ एकत्र यावेत, याला माझा विरोध नाही," असं म्हणत त्यांनी संभाव्य युतीच्या चर्चेला एक वेगळी दिशा दिली आहे.
मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी याच विषयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, "आम्ही आमची भावना व्यक्त केली आहे. जो कोणी मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यासोबत येण्यास तयार असेल, त्याच्यासोबत आम्ही काम करू."
त्यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त आंदोलनाचा दाखला देत सांगितलं, "आमचे नेते दीपेश म्हात्रे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं, हेच त्याचं उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे, हे आम्हाला समजतं. आणि आमचे मनही स्पष्ट आहे."
युती ट्विटरवर होत नाही
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चेला अधीरतेचा नवा टप्पा आता मिळाला आहे. अमित ठाकरे यांचं विधान हे राजकीय वर्तुळात एक प्रकारचं ‘इनवर्ड रिऍलिटी चेक’ ठरतंय. "युती ट्विटरवर नाही, फोनवर होते."
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या विधानात युतीची दारं उघडी ठेवली गेल्याचं स्पष्टपणे दिसतं. हे दोन्ही संकेत आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
ठाकरे लवकरच एकत्र येणार
सध्या तरी राज ठाकरे यांनी याविषयी मौन बाळगलेलं असलं, तरी त्यांनी याआधी अनेकदा महाराष्ट्रहितासाठी मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. आता लक्ष आहे ते या दोन बंधूंमध्ये होणाऱ्या प्रत्यक्ष संवादाकडे. कारण जसे अमित ठाकरे म्हणतात, "त्यांच्याकडे नंबर आहेत."