Uddhav Raj Thackeray Reunion "उद्धव, राज आणि शिंदेंनी एकत्र यावे" ज्येष्ठ शिवसैनिक गजानन कीर्तिकर यांचे भावनिक आवाहन

Published : Jun 08, 2025, 08:20 AM IST
kirtikar

सार

'उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेही एकत्र आले पाहिजेत. शिवसेनेचे खरे स्वरूप पुन्हा उभे राहिले पाहिजे. अखंड शिवसेना ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची भावना आहे.

मुंबई - शिवसेनेतील जुने, निष्ठावान कार्यकर्ते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातले पहिलेपिढीतले सेनानी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना एकसंघ व्हावी, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. 'उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघेही एकत्र आले पाहिजेत. शिवसेनेचे खरे स्वरूप पुन्हा उभे राहिले पाहिजे. अखंड शिवसेना ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची भावना असून, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,' असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

गजानन कीर्तिकर म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व असताना शिवसेनेत एकवाक्यता होती. त्यावेळी राज आणि उद्धव यांच्यात मतभेद होते, पण तरीसुद्धा दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले होते. आज मात्र शिवसेना तुकड्या-तुकड्यांत विभागली गेली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत गेलेली सेना, आणि स्वतंत्र वाट चालणारे राज ठाकरे यांची मनसे. पण आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांची हीच अपेक्षा आहे की 'ठाकरे' हे ब्रँड कायम राहावं, आणि पुन्हा एकदा अखंड शिवसेना उभी राहावी."

अटी ठेवू नयेत

राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर बोलताना कीर्तिकर म्हणाले, "मला समजते की सध्या दोघांनी एकमेकांसमोर अटी ठेवल्या आहेत. उद्धव ठाकरे म्हणत आहेत की राज ठाकरे यांनी महायुती सोडावी, तर राज ठाकरे म्हणत आहेत की उद्धव यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी. मी म्हणतो, या दोघांच्याही अटी योग्य आहेत. कारण शिवसेना ही ना भाजपप्रणित असावी, ना काँग्रेसप्रणित. बाळासाहेबांनी जी विचारधारा मांडली - हिंदुत्व, आक्रमक राष्ट्रवाद, मराठी माणसाचा अभिमान आणि त्याचा विकास - ती विचारधारा कुठल्याही राजकीय गठबंधनाच्या पलीकडची आहे."

शिंदेंनीही पुढाकार घ्यावा

"जर अखंड शिवसेना पुन्हा उभी करायची असेल, तर केवळ राज आणि उद्धव नाही तर एकनाथ शिंदेंनाही एकत्र यावं लागेल," असे सांगून त्यांनी सूचित केले की, भाजपसोबत असल्यामुळे शिंदेंना मर्यादा येत आहेत. "त्यांनी सुरुवातीला बाळासाहेबांचे मुद्दे पुढे नेत हिंमतीने पावलं उचलली, पण भाजपच्या मर्यादांमुळे त्यांना पूर्ण ताकदीने पुढे जाता आले नाही. हे वास्तव आहे."

याचा मोठा फायदा भाजपला

गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "शिवसेनेच्या तुकड्यांमुळे सर्वात मोठा फायदा भाजपला होत आहे. ही परिस्थिती बाळासाहेबांनी कधीच स्वीकारली नसती. त्यामुळे आज जर त्यांची खरी शिवसेना पुन्हा उभी करायची असेल, तर हे सर्व नेते, उद्धव, राज आणि शिंदे, यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे."

मी सर्व जुळवून आणेल

"अखंड शिवसेनेसाठी मी पुढाकार घेईन. मला त्याचा अधिकारही आहे, कारण मी बाळासाहेबांसोबत शिवसेनेच्या जडणघडणीत भाग घेतलेला आहे. राज, उद्धव आणि शिंदे यांना मी वैयक्तिक पातळीवर ओळखतो. त्यामुळे मी माझी भावना त्यांच्या समोर मांडणारच. आग्रह धरून, त्यांना समजावून सांगून पुन्हा शिवसेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे जुने दिवस पुन्हा यावेत, हीच मनापासून इच्छा आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसैनिकांची भावना समजून घ्या

गजानन कीर्तिकर यांचे हे वक्तव्य सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात एक महत्त्वपूर्ण संदेश म्हणून पाहिले जात आहे. जिथे शिवसेना अनेक तुकड्यांमध्ये विखुरली आहे, तिथे हा सन्माननीय ज्येष्ठ शिवसैनिक पुन्हा एकत्रीकरणाची मशाल घेऊन पुढे सरसावला आहे. महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिक आणि सामान्य नागरिक देखील त्यांच्या या भावनेशी जोडले गेले आहेत.

पुढील राजकीय घडामोडींमध्ये कीर्तिकर यांच्या या पुढाकाराला किती प्रतिसाद मिळतो आणि उद्धव-राज-शिंदे या तिघांच्या भूमिकेत काय बदल होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, एक गोष्ट निश्चित, शिवसेनेच्या अखंडतेसाठी पुन्हा एकदा एक प्रामाणिक आवाज उठलेला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज