
मुंबई - मुंबईचा क्रिकेटचा ‘राजा’ रोहित शर्मा याच्या नावे वानखेडे स्टेडियममध्ये स्टँड नावानं आजपासून ओळखलं जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित एका भव्य समारंभात या स्टँडचं अनावरण करण्यात आलं.
या ऐतिहासिक क्षणासाठी रोहित शर्मा संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होता. त्याचे आई-वडील, पत्नी रितिका सजदेह, भाऊ आणि वहिनी हे सर्व स्टेजवर उपस्थित होते. स्टँडच्या अनावरणाच्यावेळी रितिकाला अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण स्टेडियम रोहितच्या जयघोषाने दुमदुमून गेलं.
अलीकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळलेला हा एकमेव यशस्वी खेळाडू, आज वानखेडेवर भावनांनी भरलेल्या नजरेने आपला स्टँड पाहत होता. “हे क्षण शब्दांत मांडणं कठीण आहे,”
असं तो म्हणाला. स्टँडजवळ त्याच्या कसोटी जर्सीचा मोठा फोटो आणि त्याच्या काही आठवणी जतन करणाऱ्या गोष्टीही ठेवण्यात आल्या आहेत.
या समारंभात आणखी तीन प्रतिष्ठित व्यक्तींना मान देण्यात आला:
शरद पवार स्टँड – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि BCCI अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्या नावे स्टँडचं उद्घाटन झालं.
अजित वाडेकर स्टँड – भारताचे पहिले परदेशातील मालिका विजेते कप्तान अजित वाडेकर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते या स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं.
अमोल काळे ऑफिस लाँज – मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अलीकडे निधन झालेले अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑफिस लाँजला त्यांचं नाव देण्यात आलं.
रोहित शर्माच्या या गौरवाच्या क्षणी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ देखील उपस्थित होता. वानखेडे स्टेडियमवर खेळत-खेळत मोठा झालेला रोहित आज तिथेच शाश्वत स्मरणाचा भाग बनला.
या अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ MCA ने शेअर केला असून, क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक अभिमानाचा आणि भावनात्मक क्षण ठरला आहे. वानखेडे स्टेडियम आता केवळ क्रिकेटचा मंदिर राहिलेला नाही, तर रोहित शर्माच्या प्रेरणादायी वाटचालीचं प्रतिक ठरत आहे.
"मुंबईचा राजा" आता कायमचा वानखेडेवर राज्य करणार असल्याचे दिसून येत आहे. ‘रोहित शर्मा स्टँड’ त्याच्या क्रिकेट प्रवासाची ऐतिहासिक ओळख बनला आहे.