
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाव्य सामाजिक तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात काही घटना घडवून दंगलीचा प्रयत्न केली जाण्याची शक्यता राज ठाकरेंनी व्यक्त केली. याशिवाय दंगलींमध्ये तरुणांना अडकवले जाऊ शकते, असा दावाही राज ठाकरेंनी करत कार्यकर्त्यांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरून येणाऱ्या कोणत्याही पोस्ट किंवा संदेशावर लगेच प्रतिक्रिया न देता आधी त्याचे व्हेरिफिकेशन करा असेही राज ठाकरे म्हणाले.
देशातील सध्याच्या वातावरणावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करावे, आपल्या श्रद्धेचा अभिमान बाळगावा. मात्र धर्मांध होणे योग्य नाही. धर्म आणि जातीच्या वादांमध्ये तरुणांना अडकवून ठेवले जाते. यामुळे बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती आणि आर्थिक परिस्थिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
यंदाच्या गणेशोत्सवाबाबत राज ठाकरे यांनी विशेष चिंता व्यक्त केली. ‘गणपतीच्या दिवसांमध्ये कुठे दंगली घडू नयेत,’ असे सांगत त्यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ किंवा मेसेज समोर आल्यास त्यावर तातडीने प्रतिक्रिया देऊ नका. कोणतीही कृती करण्यापूर्वी ती घटना खरी आहे की एखादा ‘ट्रॅप’ आहे, याची खातरजमा करा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
देशातील बेरोजगारी, शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीचा मुद्दा राज ठाकरे यांनी भाषणात उपस्थित केला. तरुणांना धर्म आणि जातीच्या वादात गुंतवले जात असताना रोजगार, उद्योग-व्यवसाय आणि शिक्षणासारखे प्रश्न मागे पडत असल्याचे ते म्हणाले. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या, देशातून बाहेर जाणारे उद्योगपती आणि देशातील रोजगाराच्या संधी यावरही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. देशाची आर्थिक परिस्थिती खरोखरच मजबूत असेल तर तरुण आणि उद्योजक परदेशाकडे का वळत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पसरणाऱ्या संदेशांबाबतही कार्यकर्त्यांना सावध केले. निवडणुकीच्या किंवा धार्मिक वातावरणाच्या काळात काही घटना जाणीवपूर्वक घडवून त्यातून तरुणांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही पोस्ट किंवा घटनेवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याचे व्हेरिफिकेशन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या सध्याच्या स्वरूपावरही राज ठाकरे यांनी टीका केली. पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याऐवजी मोठ्या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि लेझर लाइट्सचा वाढता वापर योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवाची सुरुवात ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक उद्देशाने झाली, त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे स्वरूप टिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील नागरिकांनी धार्मिक किंवा भाषिक वादांमध्ये अडकण्याऐवजी आपल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ‘नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि जाणीवपूर्वक घडवलेल्या घटनांपासून स्वतःला दूर ठेवा,’ असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या काळात सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी संयम आणि सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचेही राज ठाकरेंनी अधोरेखित केले.