703 कोटींचे विमा कवच अन् 66 किलो सोने; मुंबईतील GSB गणपतीच्या उत्सवाची जय्यत तयारी

Published : Sep 07, 2026, 09:20 AM IST
GSB Ganpati

सार

मुंबईतील GSB सेवा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी 703.27 कोटी रुपयांचा विमा कवच घेतला आहे. याशिवाय मंडळाकडून यंदा गणपतीसाठी जय्यत तयारीही केली जात आहे.

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाने (GSB Seva Mandal) यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 703.27 कोटी रुपयांचा विमा कवच घेतला आहे. गेल्या वर्षी मंडळाने 474 कोटी रुपयांचा विमा कवच घेतला होता. यंदा विमा कवचाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किंग्ज सर्कल येथे होणाऱ्या या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती 66 किलोहून अधिक सोने आणि 335 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात येणार आहे.

72वा गणेशोत्सव साजरा करणार

जीएसबी सेवा मंडळ यंदा आपला 72वा गणेशोत्सव साजरा करणार आहे. मंडळाचा मुख्य उत्सव 14 ते 18 सप्टेंबरदरम्यान पाच दिवस चालणार आहे. गणरायाच्या मूर्तीचे पहिले दर्शन 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता ‘विराट दर्शन’ सोहळ्यात भाविकांना होणार आहे.

703 कोटींचे विमा संरक्षण

मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गणेशोत्सवासाठी 703.27 कोटी रुपयांचा विमा कवच घेण्यात आला आहे. भाविकांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य देणे ही मंडळाची जबाबदारी असल्याचे पै यांनी स्पष्ट केले.

66 किलो सोने, 335 किलो चांदीचे दागिने

जीएसबी सेवा मंडळाचा गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळांपैकी एक म्हणून ओळखला जातो. यंदा गणरायाची पर्यावरणपूरक मूर्तीला 66 किलोहून अधिक सोन्याचे आणि 335 किलो चांदीचे दागिने परिधान केले जाणार आहेत. याशिवाय मौल्यवान रत्नांनीही मूर्ती सजवली जाणार आहे. हे दागिने आणि मौल्यवान वस्तू प्रामुख्याने भक्त तसेच सेवेकऱ्यांकडून दान स्वरूपात दिल्या जातात, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

दररोज 40 हजार भाविकांसाठी अन्नदान

गणेशोत्सवादरम्यान मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर ‘अन्नदान सेवा’ राबवली जाणार आहे. दररोज 40 हजारांहून अधिक भाविकांना या सेवेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.तर पाच दिवसांच्या उत्सवादरम्यान दोन लाखांहून अधिक भाविकांना प्रसाद दिला जाणार आहे.

वैदिक परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम

गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत वैदिक परंपरा आणि शास्त्रानुसार विविध पूजा, प्रार्थना आणि धार्मिक सेवा आयोजित करण्यात येणार आहेत. किंग्ज सर्कल येथील उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.

छापील पावत्यांना डिजिटल पर्याय

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने यंदा छापील पावत्यांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक कागदी पावत्यांऐवजी डिजिटल पावत्या देण्यात येणार आहेत. यामुळे कागदाचा वापर कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक उत्सवाच्या दिशेने हे आणखी एक पाऊल असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Safety: मुंबईत रात्री अडीच वाजता एकटी मुलगी रिक्षानं घरी, म्हणाली - 'सुरक्षेची चिंताच नाही!'
मुंबईत 15 दिवसांसाठी कडक निर्बंध; पाच जणांच्या जमावालाही परवानगी नाही