Raj Uddhav Thackeray Reunion ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य

Published : Jun 07, 2025, 12:41 PM IST
 Shiv Sena (UBT) leader and Rajya Sabha MP Sanjay Raut (Photo/ANI)

सार

उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीबाबत चर्चांना अधिक उधाण आलं असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अधिक खळबळजनक ठरत आहेत.

मुंबई - राजकारणातील दोन 'ठाकरे' एकत्र येणार का, हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजत असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिलेलं वक्‍तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. "मी आता फक्त संदेश देणार नाही, तर थेट बातमीच देईन. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल," असे ठाम शब्द त्यांनी उच्चारले.

त्यांच्या या विधानानंतर ठाकरे-राज ठाकरे युतीबाबत चर्चांना अधिक उधाण आलं असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अधिक खळबळजनक ठरत आहेत.

"भाजपा उपऱ्यांचा पक्ष, आम्ही मराठी माणसासाठी", संजय राऊत यांची सडकून टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, "महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नव्हे. भाजपा हा शेठजींचा आणि बाहेरच्यांचा पक्ष आहे. त्यांना मराठी अस्मितेशी काही देणंघेणं नाही." त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "आम्ही १०६ हुतात्म्यांशी बांधिलकी मानणारे, बाळासाहेब व प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे शिष्य आहोत."

राऊत म्हणाले की, जशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विविध पक्ष एकत्र आले होते, तसंच आजही मराठी माणसाचा आवाज म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र यावं लागेल. "भाजपाने जो गोंधळाचं, तुटवड्याचं वातावरण निर्माण केलं आहे, त्याला उत्तर देण्यासाठी मराठी मनं एकत्र आली पाहिजेत," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"राज-उद्धव एकत्र येणं ही मराठी जनतेचीच भावना"

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त छायाचित्रावर विचारलं असता, संजय राऊत म्हणाले, "मराठी माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनात आहे की हे दोघं एकत्र यावं. जे महाराष्ट्रद्रोही आहेत, ज्यांचं केंद्र दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी हे एकत्र येणं गरजेचं आहे."

"मागच्या गोष्टींमध्ये रस नाही, भविष्याकडे पाहा", राऊतांचा टोला

राज-उद्धव यांच्यातील भूतकाळातील वाद-मतभेदांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, "२०१४ मध्ये काय झालं, २०१७ मध्ये काय झालं, किंवा १८५७ मध्ये कोणता विचार होता, हे पाहण्यात काही अर्थ नाही. जो सकारात्मक पाऊल टाकतो, तो मागे वळून पाहत नाही."

"भविष्याकडे पाहा, हेच आमचं धोरण आहे," असं स्पष्ट करत त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यांनी "देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि शिंदे गट यांच्यावर आरोप करत म्हटले की, "हे सगळे मिळून महाराष्ट्राला संपवण्याचे काम करत आहेत."

"फडणवीस नवी गीता लिहीत आहेत?", राऊतांचा उपरोधिक सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी करत राऊत म्हणाले, "भगवद्गीता लिहिली श्रीकृष्णाने, आता फडणवीस नवी गीता लिहित आहेत. आमचा मुख्यमंत्रीपदावरचा प्रवास ईडी, सीबीआयच्या मेहरबानीवर नाही तर जनतेच्या विश्वासावर झाला."

पोलीस, ईडी, सीबीआय यंत्रणा हातात असल्या म्हणजे आपण सर्वेसर्वा झालो, असा गैरसमज भाजपमध्ये आहे, असा संजय राऊत यांनी घणाघाती आरोप करत फडणवीसांना राजकीय टोकाचं प्रत्युत्तर दिलं.

राजकीय भूकंपाच्या तयारीत महाराष्ट्र?

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती जर खरोखरच प्रत्यक्षात आली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी घडामोड ठरू शकते. या युतीने केवळ महापालिका निवडणुकांमध्ये नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येणं, हा जनतेच्या मनात असलेला विचार असल्याचं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सूचक विधानांतून स्पष्ट होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!