
मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच रविवारी (२६ जुलै) मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली 'तिरंगा मार्च' काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी नागरिक आणि मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी असून तो पूर्णपणे अराजकीय राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा तिरंगा मार्च NEET परीक्षेतील गोंधळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि ते दडपण्याच्या कथित प्रयत्नांच्या निषेधासाठी आयोजित करण्यात आला आहे. दिल्लीतील सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचा संदेश या मोर्चातून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चा पूर्णपणे अराजकीय असल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले की, या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा असणार नाही. तसेच कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊ नयेत. मोर्च्याचे निमंत्रक आपण आणि उद्धव ठाकरे असलो तरी आपल्या नावानेही घोषणाबाजी करू नये, असे त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले.
मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालण्याचा किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. विशेषतः महिला, मुली आणि पालकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी मनसैनिकांना दिल्या.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही इशारा दिला. काहीजण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, मात्र अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा. पोलिस उपस्थित असतील तर संबंधितांना त्यांच्या ताब्यात द्यावे, अन्यथा परिस्थितीनुसार योग्य ती कारवाई करण्याची क्षमता कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.