Raj Thackeray : समोरील दृश्य काळजीत टाकणारी...दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा, सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर राज ठाकरे काय म्हणाले?

Published : Jul 16, 2026, 12:11 PM IST
Raj Thackeray on Sonam Wangchuk

सार

Raj Thackeray on Sonam Wangchuk : राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमधून सरकारवर टिका करत वांगचुक यांच्या मागण्या रास्त असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात २८ जूनपासून उपोषणाला बसले आहे. मागील १८ दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १९वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांचं वजन मागील १८ दिवसांत ८.९ किलो इतकं कमी झालं आहे.

पेपरफुटी, पेपरफुटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि इतर शैक्षणिक घोटाळे या सर्व मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांचं कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली उपोषण सुरू आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध स्तरावरुन सोनम यांना त्यांचं उपोषण सोडण्यासाठी सांगत आहेत. मात्र ते आपल्या उपोषणावर, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता सोनम यांच्या उपोषणावर राज ठाकरे यांनीही परखड मतं मांडत चिंता व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

‘सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार?’

 

 

'ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.

सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.

आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.

निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.

माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.

सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे . किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नाही! आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही !

सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मिडीयावर अडकायला लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजाण समाज राजकारणपासून दूर जाऊन लाईक्स, शेअर यातच अडकला आहे. मी अनेकदा समाजातील लोकांना आवाहन करत आलो आहे की तुम्ही कुठल्याही पक्षात जा पण राजकारणाचा भाग बना. महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला , त्यातून एक आंदोलन उभं राहिलं, महाराष्ट्रातील बहुसंख्य पक्ष एकत्र आले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. हे विसरून चालणार नाही. हे यश कुठल्या अल्गोरिदमचं नव्हतं तर लोकमत संघटित केल्यामुळे मिळालं होतं.

हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यांत काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबुज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांच्या सत्तेचा डोलारा टिकला आहे.

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त NEET नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेचा पाठीशी आहोत आणि कायम असू देखील.

पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील. पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसं झालं तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही. आत्ताच मला अनेकदा एक विचित्र तणावयुक्त शांतता जाणवत असते, आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोकं स्मशान शांततेकडे नेतील.

कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझ्या पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढे राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं.

राज ठाकरे ।'

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये पुन्हा प्रवाशावर हल्ला, विरार-चर्चगेट गाडीतील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपद गेलं, पुन्हा परतले; देवेंद्र फडणवीस यांची संयमी मुख्यमंत्री होण्याची कहाणी