
मुंबई - भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर सध्या त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका गावातील नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी वापरलेली भाषा केवळ अर्वाच्यच नाही तर लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे.
बबनराव लोणीकर यांनी एका गावात विरोधात बोलणाऱ्या काही युवकांवर टीका करताना अत्यंत संतप्त भाषेत भाष्य केलं. “तुझ्या बापाला पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले… तुझ्या मायच्या नावावर लाडकी बहिण योजनेचे पैसे आले… तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, हातातलं डबडं हे सगळं आमच्या सरकारमुळेच आहे”, असं त्यांनी म्हटलं.
याशिवाय, त्यांनी उपस्थित युवकांना उद्देशून “आमचेच पैसे घेतो आणि आम्हालाच तंगड्या वर करतो?” असा प्रश्न करत त्यांच्यावर शब्दांचा मारा केला. त्यांच्या या अशोभनीय भाषेवर सध्या सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाचे नेते संतप्त झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत लोणीकरांवर कडाडून टीका केली. त्यांनी लिहिलं –
“ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा चालणार नाही बबनराव. कारण…
तुमचे कपडे, बूट, आमदारकी, गाडीमधील डिझेल, विमानाचं तिकीट – हे सगळं जनतेमुळे आहे.
तुमचं विधानसभेतील स्थान जनतेमुळेच आहे. निवडणूक जवळ आलीय, हे वक्तव्य आम्ही लक्षात ठेवू.”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे वक्तव्य अतिशय घृणास्पद आहे. बबनराव लोणीकर यांनी किती लोणी खाल्लं, तूप खाल्लं आणि त्याचा वापर कशासाठी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना अशा अपमानास्पद भाषेत हिणवणं सहन केलं जाणार नाही. लोणीकर यांनी त्वरित माफी मागावी अथवा भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित करावं. अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही.”
राजकीय भाषेतील सुसंस्कृततेचा वारंवार उच्चार करणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच अशा प्रकारचे वक्तव्य आलं असल्यामुळे सर्वच स्तरांमधून संताप व्यक्त केला जातोय. शेतकरीविरोधी मानसिकता, अहंकार आणि सत्ता मस्तवालपणाचं दर्शन या भाषेतून होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
या संपूर्ण प्रकारावर अद्याप भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी अंतर्गत पातळीवर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं वक्तव्य पक्षाला अडचणीत आणू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकशाहीत सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून संयमित, सुसंस्कृत आणि जबाबदारीच्या भाषेची अपेक्षा असते. बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य या सगळ्याच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात जनमानसात असंतोष पसरला आहे. आता त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागणार का, की भाजप यावर कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.