
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता मराठा सैन्यातील अग्रणी सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून सोमवारी मुंबईत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तलवारीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
भोसले घराण्याचा वारसा
नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची ही तलवार राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या लिलावात जिंकली होती. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी सकाळी १० वाजता विमानतळ प्राधिकरणाकडून तलवारीचा ताबा घेतला. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाइक रॅलीसह चित्ररथावर ही तलवार पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आणण्यात आली.
‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ सोहळा
सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या वतीने संध्याकाळी ६ वाजता ‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तलवारीचे प्रदर्शन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच भोसले घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
ऐतिहासिक किल्ल्यांचे प्रदर्शन
भोसले यांच्या तलवारीसोबतच १२ वारसा मानांकित गडकिल्ल्यांची माहितीचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्टदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात भरवले जाणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य असेल.