
PM Modi in Mumbai : महामुंबईतील (वसई-विरार, पालघर आणि कल्याणपुढील भाग वगळून) प्रवाशांसाठी आता वेगवेगळ्या तिकिटांचा त्रास संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी ‘मुंबई वन’ या एकत्रित डिजिटल तिकीट प्रणालीचे उद्घाटन होणार आहे. या ॲपमुळे प्रवाशांना बस, मेट्रो, मोनोरेल आणि लोकल ट्रेन यांसह विविध सार्वजनिक वाहतूक माध्यमांसाठी एकच सामायिक ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.
महामुंबई क्षेत्रात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांची स्वतःची बससेवा आहे. यासोबत एमएमआरडीएच्या ताब्यातील मेट्रो २अ आणि ७ मार्गिका, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची मेट्रो १, एमएमआरसीएलची भुयारी मेट्रो ३, सिडकोची नवी मुंबई मेट्रो आणि मोनोरेल यांचा समावेश आहे.
याशिवाय उपनगरीय रेल्वे (लोकल) सेवाही प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत या सर्व सेवांसाठी स्वतंत्र तिकिटे घ्यावी लागत होती. मात्र आता ‘मुंबई वन’ ॲपमुळे सर्व प्रवास एकाच तिकिटात सामावला जाईल.
‘मुंबई वन’ ॲपवरून प्रवाशी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या शहरांमधून सहजपणे बस, लोकल, मेट्रो किंवा मोनोरेलने प्रवास करू शकतील. प्रत्येक वेळी वेगळे तिकीट काढण्याची गरज नसणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतील.
हे ॲप एमएमआरडीएच्या उपकंपनी *महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेड* यांनी विकसित केले आहे. उद्या पहाटेपासून या ॲपवर डिजिटल तिकीट सेवा सुरू होणार आहे.
मात्र बुधवारी उद्घाटित होणारे ‘मुंबई वन’ ॲप हे पूर्णपणे नवीन असून सर्व वाहतुकीसाठी एकच डिजिटल तिकीट पुरवणारे एकत्रित ॲप असेल.
‘मुंबई वन’ ॲपद्वारेच सामायिक तिकीट मिळणार असून ही सेवा पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच उपलब्ध असेल. प्रत्यक्ष काउंटरवर किंवा कागदी तिकिटांवर ही सुविधा मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांना ॲप डाउनलोड करून डिजिटल पद्धतीनेच तिकीट घ्यावे लागेल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.